मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्षाच्या दालनातील फोडल्या काचा

मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्षाच्या दालनातील फोडल्या काचा

चोपडा: भर पावसाळ्यातही शहरातील मल्हारपुरा, रंगराव आबानगर, पाटीलगढी, सानेगुरुजी वसाहत, भीमनगर या भागातील नागरिकांना 20 ते 22 दिवसांपासून पाणीच नाही. तसेच मल्हारपुरा भागातील नादुरुस्त कूपनलिकाही महिनाभरापासून  दुरुस्त न केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने संतप्त महिलासह नागरिकांनी आज (ता 6) रोजी सर्वसाधारण सभेत सकाळी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला.

मोर्चाचे नेतृत्व या भागातील शिवसेनेचे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष किशोर चौधरी, नगरसेविका संध्या महाजन यांनी केले. मोर्चातील संतप्त महिला व नागरिकांनी थेट नगराध्यक्षांच्या दालनात प्रवेश करीत नगराध्यक्षांना घेराव घालत, दालनातील टेबलच्या काचा फोडल्या. शेकडोच्या संख्येने आलेल्या महिलांनी लागलीच नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रवेश करीत पाण्यासाठी हाल होत आहेत.

गेल्या मार्च महिन्यापासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. भर पावसात तापी नदी देखील ओसंडून वाहत असतांना शहरातील मल्हारपूरा, सानेगुरुजी वसाहत, रंगराव आबानगर भागात पाणी पुरवठा होत नाही. मल्हारपूरा भागात बोरवेल असून बोरवेलची मोटार जळून 22 दिवसापासुन नादुरुस्त आहे. तरी त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा मोर्चा नगरपालिकेवर निघून नगराध्यक्षाच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक करून टेबलच्या काचा फोडण्याची घटना घडली.

यावेळी नगराध्यक्षा मनीषा चौधरी व त्यांचे पती गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक अशोक बाविस्कर, हुसेन खाँ पठाण खाँ, कार्यालयीन अधीक्षक राजू बाविस्कर यांनी मोर्चेकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, ते पुन्हा मासिक सभेच्या ठिकाणी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रवेश केल्यानंतर नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, उपनगराध्यक्षा सुप्रिया सनेर, नगरसेवक अशोक बाविस्कर, डॉ. रवींद्र पाटील, महेंद्र धनगर यांच्या समोर संतप्त भावना व्यक्त केल्यात. याबाबत अनेक वेळा सांगूनही दुर्लक्ष होत असून आमचे हाल होत असल्याच्या प्रतिक्रिया माडल्या. नगरसेवक दखल घ्यायला तयार नाहीत, जावेतर कुणाकडे..? अशा संतापजनक भावना नागरिकांना व्यक्त केल्या.

महिला वर्ग दिवसभर शेतीच्या कामाला जातात आणि संध्याकाळी घरी आल्या की त्यांना पाण्यासाठी भटकत फिरावं लागत आहे. त्यामुळे या भागातील महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. अधिकारी असो की पदाधिकारी असो, कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मोर्चात सुरेखा महाजन, रुखसाना खाटीक, सुमन भोई, कमला पाटील, सुमन महाजन, विमलबाई पाटील, कमलबाई सैंदाने, आशाबाई खाटीक, दिलशादबी खाटीक, इंदूबाई शिरसाठ, सलमाबी खाटीक, विमलबाई कंगार, बेबीबाई बाविस्कर, आफरोज खाटीक, महेश माळी, अरुण दिलवर, रमेश सैंदाने, अरमान खाटीक यांच्यासह शेकडो महिलावर्ग व नागरिक सामील होते. 

मुख्याधिकारी गायब 
आज ता. 6 रोजी सर्वसाधारण सभा होती या सभेस न. प. मुख्याधिकारी बबन तडवी हे देखील उपस्थित होते परंतु मोर्चाचे तीव्र रूप पाहून मुख्याधिकारी गायब झालेत मोर्चेकऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना बोलवा, सी ओ, सी. ओ अशा घोषणा सभागृहात दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com