पुजारी टोळीच्या चौघांना 'मोक्‍का'अन्वये आज शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नाशिक - बांधकाम क्षेत्रातील नामांकित "एकता ग्रीन व्हिले'च्या इंदिरानगर येथील कार्यालयात जाऊन वारंवार खंडणी मागूनही न दिल्यामुळे रवी पुजारी टोळीच्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना 2011 मध्ये घडली होती. या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या चौघांना शुक्रवारी (ता. 12) विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती यू. एम. नंदेश्‍वर शिक्षा ठोठावणार आहेत. गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेने केला आहे.

संजयसिंग ऊर्फ संजय सीताराम डोलकर ऊर्फ संजय थापा ऊर्फ संजय नेपाळी ऊर्फ पीटर (वय 33, रा. मुंबई), अरविंद चव्हाण ऊर्फ चिंटू (33, मुंबई), विकासकुमार सिंग (22, मुंबई), संदीप रामाश्रम शर्मा ऊर्फ संदीप भय्या असे "मोक्का'न्वये शिक्षा ठोठावण्यात येणाऱ्या आरोपींची नावे आहेत. एकता एम्पायरच्या बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागूनही न दिल्याने पुजारी टोळीच्या दोघांनी त्यांच्या इंदिरानगरमधील कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. यात दोघे कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी गेल्या 2014 पासून नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात खटला सुरू होता.

शिक्षेकडे लक्ष
रवी पुजारी टोळीतील चौघांना "मोक्का'न्वये प्रत्येकी किमान पाच वर्षे व किमान पाच लाख रुपयांपर्यंत, तसेच प्राणघातक हल्ल्यातही किमान दहा वर्षांपर्यंतची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. मुख्य आरोपी रवी पुजारी यालाही दोन महिन्यांपूर्वी आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक झाली आहे. त्यामुळे त्याचे भारताला प्रत्यार्पण झाल्यानंतर त्यासह या खटल्यात शिक्षा ठोठावली जाऊ शकेल.

Web Title: Pujari Gang Four Member Mokka Crime Punishment