मातीमिश्रित मुरूमाने खड्डे बुजविण्याचा 'जावईशोध'

chalisgav highway.jpg
chalisgav highway.jpg

चाळीसगाव : चाळीसगाव- धुळे महामार्गावरील खड्ड्यांच्या संदर्भातील वृत्त २९ सप्टेंबरच्या ‘सकाळ’मध्ये ‘चाळीसगाव -धुळे रस्ता देतोय मृत्यूला आमंत्रण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने चाळीसगावकडून धुळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजावण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, त्यासाठी मातीमिश्रित मुरुमाचा वापर केला जात असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप वाहनधारकांमधून होत आहे. दोन दिवसांपूर्वी चाळीसगाव येथून धुळे येथे जात असताना मेहुणबारे गावाजवळ क्रुझर गाडी (एमएच. १९- ४७९८) ही खड्ड्यात पडल्याने गाडीच्या मागचे टायर फुटले. ज्यामुळे गाडीचे नुकसान झाले. असे प्रकार दररोज कुठल्या ना कुठल्या वाहनाचे होतच असते. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली असून मुरूमऐवजी खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात येत आहे.

थातूरमातूर डागडुजी

या महामार्गाची दोन वर्षात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. औरंगाबादकडून धुळे, सुरत किंवा इंदूरकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे या रस्त्याचे भरभक्कम काम करावे, अशी मागणी होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीमिश्रित मुरुम टाकण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे या खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’अशीच होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मुरुमावर खर्च केला जात असला तरी हा खर्च पाण्यात जाणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चाळीसगाव- धुळे महामार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे अभियंता अग्रवाल यांनी सांगितले. सध्या निवडणुकांची धामधूम असल्याने केवळ थातूरमातूर खड्डे बुजवून मलमपट्टी केली जात आहे.

अनेकांना जडले मणक्यांचे विकार

या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना कुठून चालवावे, असा प्रश्‍न चालकांना पडलेला असतो. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे मोजता येणार नाहीत, असे अगणित खड्डे या रस्त्यावर पडल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. वाहनधारकांना अक्षरशः कसरत करून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या खराबीमुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. बऱ्याच दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या संदर्भात खासदार उन्मेष पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सद्यःस्थितीत किमान खड्डे तरी बुजावेत, अशी आर्त मागणी होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com