शेतकऱ्यांपाठोपाठ यंत्रमाग कामगारांचा गळ्याला फास 

प्रमोद सावंत
रविवार, 2 डिसेंबर 2018

मालेगाव - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर असताना यंत्रमाग कामगारांच्या आत्महत्यांचा नवीन प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न एकट्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे, ज्या ठिकाणी यंत्रमाग कारखाने आहेत त्या ठिकाणी अशीच स्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्यात सुमारे 20 लाख यंत्रमाग असून, दहा लाख कामगार कार्यरत आहेत. या आत्महत्यांकडे शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. 

मालेगाव - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर असताना यंत्रमाग कामगारांच्या आत्महत्यांचा नवीन प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न एकट्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे, ज्या ठिकाणी यंत्रमाग कारखाने आहेत त्या ठिकाणी अशीच स्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्यात सुमारे 20 लाख यंत्रमाग असून, दहा लाख कामगार कार्यरत आहेत. या आत्महत्यांकडे शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. 

शेतीपाठोपाठ सर्वाधिक रोजगार देणाऱ्या यंत्रमाग व्यवसायात गेली दोन वर्षे मंदीचे सावट आहे. असंख्य यंत्रमाग बंद पडू लागले आहेत. यंत्रमाग कामगारांना पुरेसे काम मिळणे अवघड झाले आहे. पर्यायी कामही नसल्याने शेतकऱ्यांपाठोपाठ यंत्रमाग कामगारांनी आर्थिक अडचणीमुळे गळ्याला फास आवळत आहेत. मालेगाव शहर उपअधीक्षक कार्यक्षेत्रातील पाच पोलिस ठाण्यांत जानेवारी ते नोव्हेंबर 2018 अखेर 49 आकस्मिक मृत्यूच्या नोंद करण्यात आल्या आहेत. यात 25 यंत्रमाग कामगार असल्याचे कारखानदार व व्यावसायिकांनी सांगितले. जिल्ह्यात 97 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या तुलनेत यंत्रमाग व्यवसाय असलेल्या एकाच शहरातील हा आत्महत्यांचा आकडा विचार करायला लावणारा आहे. 

एका यंत्रमागावर रोज सरासरी चाळीस मीटर कापडनिर्मिती होते. एक कामगार दहा यंत्रमाग हाताळतो. या हिशेबाने चारशे मीटर कापड तयार होते. एक रुपया मीटर मजुरीप्रमाणे त्याला चारशे रुपये रोज हिशेबाने चार दिवस काम चालल्यास सोळाशे रुपये मिळतात. सहा दिवस काम केल्यास दोन हजार चारशे मिळतात. कुशल व अनुभवी कामगार रोज पाचशे मीटर कापड तयार करतात. सहा दिवस कारखाना चालल्यास ते दर आठवड्याला तीन हजार रुपये मिळवितात. मंदीमुळे कापडाला उठाव नाही. कारखाने चारच दिवस चालतात. तयार ग्रे कापड यंत्रमाग कारखानदार प्रतिमीटर एक रुपया कमी दराने विक्री करतात. त्याची झळ कामगारांना बसली आहे. 

यंत्रमाग कामगारांबरोबरच कारखानदारांची स्थितीही बिकट आहे. देणी व थकबाकीमुळे एका कारखानदाराला मालमत्ता विकावी लागली. भिवंडी येथील असंख्य यंत्रमाग बंद पडले आहेत. माझ्या नातेवाइकाने भंगारात यंत्रमाग विक्री केले. 
- शब्बीर डेगवाले, यंत्रमाग व्यावसायिक 

यंत्रमाग कामगार आत्महत्येची कारणे 
* यंत्रमागातील मंदी * घटलेला रोजगार * वाढती महागाई * कमी झालेली आवक * ताणतणाव * पाल्यांचा वाढता शैक्षणिक खर्च 
* आजारपण * रॉकेलची हद्दपारी * घरगुती गॅसची दरवाढ * मोबाईलसह अनावश्‍यक वस्तूंचा वाढता खर्च 
* कुटुंबीयांच्या पर्यटन व वाढत्या आकांक्षा 

कामगारहितासाठी उपाययोजना 
* यंत्रमाग कामगारांना शासनातर्फे घरकुल 
* कामगारांना मिळावे अनुदानरूपी कर्ज 
* यंत्रमाग कामगार महामंडळाची स्थापना 
* आजारपणात अत्यल्प दरात उपचार 
* कारखानदार व नातेवाइकांनी अडचणीच्या काळात द्यावी उचल 
* ताणतणावमुक्तीसाठी समुपदेशन 
* स्वस्त धान्य, रॉकेल व अन्य माध्यमातून शासनाचे सहकार्य 
* कामगारांच्या मुलांना शिक्षणशुल्क माफी 

राज्यातील यंत्रमागांची स्थिती 
शहर यंत्रमाग संख्या कामगार संख्या 
भिवंडी 12 लाख सहा लाख 
मालेगाव 3 लाख दीड लाख 
इचलकरंजी 2 लाख 80 हजार 
सोलापूर 50 हजार 20 हजार 
कामठी-नागपूर 50 हजार 15 हजार 
धुळे 30 हजार 12 हजार 

Web Title: Question for the textile workers suicide