चाळीसगाव : जामदा येथे दारु अड्ड्यांवर छापा 

दीपक कच्छवा 
रविवार, 22 सप्टेंबर 2019

जामदा (ता. चाळीसगाव) येथे मेहुणबारे पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवायांचा धडाका सुरू केला आहे. कारवाईच्या भितीने विक्रेत्यांनी दारु गायब केली आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : जामदा (ता. चाळीसगाव) येथे मेहुणबारे पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवायांचा धडाका सुरू केला आहे. कारवाईच्या भितीने विक्रेत्यांनी दारु गायब केली आहे.

दारुभट्टीची शोध मोहीम उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांनी सुरु केली आहे. आज सायंकाळी पाचला गिरणापात्रात ७ हजार ८०० रुपयांचा माल नष्ट केला. जामदा परिसरात कारवाया होत असल्याने दारु विक्रेत्यांनी जणू काही धसकाच घेतल्याचे चित्र दिसत आहे.

जामदा (ता. चाळीसगाव) येथील संतप्त झालेल्या सुमारे दोनशे महिलांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली होती. आज मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे व रवी पाटील यांनी सायंकाळी साडेपाचला जामदा  गावात धडक दिली. या ठिकाणी गावाच्या बाहेर मंदीर परीसरात दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांना मिळाली. चार दिवसांपासून या भागात कारवाया सुरु आहेत. जामदा शिवारातील गिरणा नदीपात्रालगतच्या टेकडीवरील झुडपात लपवून ठेवलेल्या गावठी दारूच्या मालावर छापा टाकून सुमारे सहा हजार रुपये किंमतीचे ४०० लीटर कच्चे रसायन २ ड्रम १८०० रुपयांचे असा एकूण ७ हजार ८०० चा माल जागेवर नष्ट करण्यात आला. गावात कारवाया होत असल्याने अनेकांनी धंदा बंद केला असला तरी काहींनी दारू लपवून ठेवली आहे. अजूनही काही ठिकाणी चोरून दारु विक्री सुरुच असल्याने त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

जामदा गावात ज्या भागात दारू विक्री केली जाते. त्या भागात सायंकाळी साडेपाचला उपनिरीक्षक श्री. शिंदे यांनी विशेष मोहीम राबवली. पोलिसांच्या या कारवाईच्या धसक्याने अनेकांनी दारु विक्री करणे बंद केले. या कारवाईमुळे दारु विक्रेत्यांमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. जामदा व वडगावलांबे भागातील दारु हद्दपार करण्याचा विडा पोलिसांनी उचलला आहे. चाळीसगाव तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या संदर्भात दखल घेतली जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले.

कारवाईचे महिलांमधून स्वागत
ग्रामीण भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या गावठी दारूमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेऊनही दारुबंदीचे ठरावही करण्यात आले आहेत. या ठरावांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात असून या कारवाया अशाच सुरु ठेवाव्यात, अशी मागणी महिलांमधून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid at liquor bases in Jamda