कपलिंग तुटल्याने रेल्वेसेवा विस्कळित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

डिझेलने घेऊन चाललेल्या रेल्वेगाडीच्या एका वाघिणीचे कपलिंग नांदगाव रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटरवर तुटले. मात्र गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

नांदगाव - डिझेलने घेऊन चाललेल्या रेल्वेगाडीच्या एका वाघिणीचे कपलिंग नांदगाव रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटरवर तुटले. मात्र गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. दुरुस्तीला दीड तास वेळ लागल्याने भुसावळकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक प्रवासी गाड्या ठिकठिकाणी थांबून राहिल्याने त्यांना दोन ते तीन तासांचा विलंब होऊन रेल्वेसेवा विस्कळित झाली. 

पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम प्रकल्पातून डिझेल घेऊन निघालेली 52 वाघिणींची रेल्वेगाडी सकाळी ईदगाह स्थानकादरम्यान असताना 40 क्रमांकाच्या वाघिणीचे कपलिंग तुटल्याने थांबली. तलाडीकडे (जि. चंद्रपूर) जाणाऱ्या या रेल्वेत एचएसडी (युरो-4) हे हायस्पीड डिझेल होते. कपलिंग तुटताच ब्रेकची सुरक्षायंत्रणा कार्यान्वित झाल्याने इंजिनाला जोडलेल्या वाघिणी व अलग झालेल्या वाघिणी जागच्या जागी थांबल्या. गाडी वेगात असती व वाघिणी रुळावरून खाली घसरल्या असत्या, तर इंधनगळतीने मोठी दुर्घटना घडली असती; पण सुदैवाने हा प्रसंग टळला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway service disrupted because of coupling

टॅग्स