पंधराच मिनिटात होत्याचे नव्हते झाले...

banana
banana

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील गिरणा परिसरात पंधराच मिनिटात होत्याचे नव्हते झाले. पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या केळी बागा काल (११ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. वादळामुळे फळबागांसह अनेक घरांची पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तालुक्यात सुमारे ८० लाखांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. 

चाळीसगाव तालुक्यात काल (११ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. वरखेडे (ता. चाळीसगाव) भागात वादळाचा मोठा फटका बसला. या भागातील जवळपास साठ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले असून केळीची झाडे अक्षरशः उन्मळून आडवी पडल्याने सुमारे पन्नास लाखांच्यावर नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यावर्षी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या केळीच्या पोटच्या मुलाप्रमाणे जतन केल्या होत्या. वादळामुळे त्या उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. 

या शेतकऱ्यांचे नुकसान 
केळीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये वैशाली येवले, विठ्ठल येवले, जिजाबाई पाटील, रुखमाबाई पाटील, शिवाजी जगताप, दगडू जगताप, तुकाराम जगताप, राजेंद्र कच्छवा, द्वारकाबाई पवार, बापूसिंग कच्छवा, कौतिक गवारे, सुरसिंग पवार, सुनील जगताप, इंद्रसिंग पवार, द्वारकाबाई पाटील, राजेंद्र पाटील, दिलीप गवारे यांच्यासह इतरही काही शेतकऱ्यांचा समावेश आहे. तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची माहिती घेतल्यानंतर कृषी साहाय्यक अविनाश चंदिले, तलाठी जगदीश शिरसाट, उत्तम तिरमली यांनी पंचनामे सुरू केले आहेत. 

फळबागांचे नुकसान 
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच शेतकरी होरपळून निघालेला आहे. त्यात वादळाचा फटका बसल्याने शेती करावी तरी कशी? या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. वादळामुळे तिरपोळे, मांदुर्णे, सायगाव, उपखेड, सांगवी, बोढरे, तळोंदे या गावांमधील फळबागांचे नुकसान झाले आहे. जवळपास संपूर्ण तालुक्यात ८० लाखांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यात आंबा, लिंबू, पेरु तसेच इतर फळपिकांचा समावेश आहे. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. 

दरेगावला घरांची पत्रे उडाली 
दरेगाव (ता. चाळीसगाव) येथे वादळामुळे सहा घरांची पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले असून सहाही जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. एका घराचा पत्रा उडून गावातील बाळू मधुकर राठोड यांच्या बैलाला लागल्याने बैलाच्या खांद्याला मोठी जखम झाली आहे. शिवाजी जमराव गायकवाड, दगडू वाल्मिक राठोड, अण्णा जयसिंग सोनवणे, किशोर भीमराव राठोड यांच्यासह आणखीन दोन ते तीन जणांच्या घरांची पत्रे उडाली आहेत. गावातील समाज मंदिराची भिंत कोसळल्याने नुकसान झाले. 

वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तलाठी व कृषी साहाय्यकांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा अहवाल तयार करून लगेचच तहसील कार्यालयात आम्ही 
तो सादर करु त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे तो सादर केला जाईल. 
- गणेश लोंखडे, मंडळधिकारी, मेहुणबारे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com