मुसळधारेने तुंबले शहर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

महामार्गावर पाणीच पाणी 
नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर परिसरात तोफखाना केंद्राच्या प्रवेशद्वार, बोधलेनगर, नाशिक रोडला शिवाजी पुतळा ते नवले चाळ, मेन गेट, टाकळी मार्गावर जय शंकर लॉन्स ते सायखेडा मार्गावरील सगळा रस्ताच पाण्याखाली गेला होता. पाण्यातून वाहने चालविणे शक्‍यच नसल्याने अनेकांना पाण्यातून पायी चालत वाहने न्यावी लागली. उपनगर ते बोधलेनगर भागात महामार्गावरील पाण्यामुळे रस्ता वाहतूक कोंडीने ठप्प झाला होता. शहरात सायंकाळी ठिकठिकाणी वीजपुरवठा बंद झाला. रात्री सव्वाआठला वीजपुरवठा सुरू झाला तर काही भागात अधूनमधून वीज गायब होत होती.

नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने ठप्प पडले. साचलेल्या पाण्यातून वाहनांचा मार्गस्थ व्हावे लागले.

शालिमार ते गंजमाळ सिग्नल परिसरात रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. पिनॅकल मॉलजवळ झाड पडले. सराफ बाजारासह गोदावरीत मिसळणारे सगळे नाले तासाभरात ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे नदीलगतच्या चौफेर नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागला. सिटी सेंटर मॉल भागात पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली गेले. टाकळी मार्गाने जेल रोडला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावर एवढे पाणी साचले, की दुचाकीच्या डिकीत पाणी शिरण्यापर्यंत पाणी साचले. सगळीकडे गुडघाभर पाणी असताना या मार्गावर मात्र त्याहून जास्त पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक काही वेळ जवळजवळ बंद झाली होती. 

नाशिक रोडला मेन गेटपासून ते शिवाजी पुतळ्यापर्यंत उड्डाणपुलाखाली असेच पाणी साचले होते. अग्निशमन दलाच्या पथकातर्फे शिखरेवाडी, पारिजातनगर (जेल रोड), रुक्‍मिणीनगर, सरस्वतीनगर, प्रगतीनगर, जुना सायखेडा मार्ग या भागात रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी उशिरापर्यंत पंप लावून पाणी काढण्याचे काम सुरू होते.

एकलहरेत अनेक घरे, दुकानांत शिरले पाणी
एकलहरे - एकलहरे येथे सोमवारी (ता. १) दुपारी साडेचारच्या सुमारास मुसळधारेने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. सिद्धार्थनगर परिसरात अनेक ठिकाणी घरांत, दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले. जागोजागी पाण्याचे तळे साचल्याचे चित्र दिसत होते. ग्रामपंचायतीकडून जेसीबी लावून साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू होते. सायंकाळी उशिरापर्यंत संततधार सुरू असल्याने वसाहतीत भरणाऱ्या सोमवार बाजारावरही परिणाम झाला.

भगूर, देवळालीत मुसळधार 
देवळाली कॅम्प : भगूर, देवळाली कॅम्प परिसरातील गावांमध्ये मुसळधार झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. नागझिरा नाला दुथडी वाहत होता. यामुळे या मार्गाने होणारी वाहतूक काही वेळ विस्कळित झाली होती. भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. हाउसन रोड, आनंद रोड, लॅम रोड, रेस्ट कॅम्प रोड, स्टेशनवाडी, सहा चाळ, विविध सॅनिटोरियम, मंदिरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

भगूरमधील बाजारपेठही पावसामुळे विस्कळित झाली. शहराला लागून नाल्यांना पूर आला. ग्रामीण भागातील नाणेगाव, शेवगे दारणा, लहवित, दोनवाडे, राहुरी, वंजारवाडी, लोहशिंगवे, संसरी आदी गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली. ग्रामीण भागातील वीजपुरवठा अनेकदा खंडित झाला होता.

उत्तमनगरला पाण्याचे तळे
अंबड - उत्तमनगरजवळील बुद्धविहाराजवळ महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या चुकीच्या कामामुळे पुलापासून ते बुद्धविहारापर्यंत जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. साचलेले पाणी येथील दुकानदारांच्या दुकानात घुसले, तर वाहनधारकांना वाहन लोटून मार्ग काढावा लागला. काही दिवसांपूर्वी बुद्धविहाराजवळील पुलाचे काम करण्यात आले. या पुलाखाली छोटे पाइप टाकण्यात आले. पुलाची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढविण्यात आली. त्यामुळे या परिसरात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले. या ठिकाणी वाहने बंद पडल्याने ढकलून न्यावे लागली. व्यापाऱ्यांना काही काळ दुकाने बंद ठेवावे लागले. याबाबत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुनील जगताप यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Environment Traffic