नाशिक जिल्ह्यात संततधार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

इगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या आगमनाने बळिराजाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज अखेर इगतपुरीत 2 हजार 599 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे यंदाच्या हंगामातील पावसाने सरासरीचा पहिला टप्पा पार केला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर तालुक्‍याचा काही भाग आणि दिंडोरी वगळता इतर तालुके कोरडेच होते. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडले होते. पावसाच्या आगमनामुळे पिकांना खते देण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू झाली आहे. तसेच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव, येवला, मालेगाव, चांदवड, सिन्नर, निफाड तालुक्‍यांत 50 पेक्षा अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही या ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. तर नाशिक शहर, तालुका आणि दिंडोरी तालुक्‍यात पावसाची रिपरिप थांबली आहे.
त्र्यंबक, इगतपुरी, पेठ व सुरगाणा या आदिवासी बहुल भागांत पावसाची संततधार सुरू असून, 50 पेक्षा अधिक मिलिमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झाली आहे.

Web Title: rain in nashik district