आते फक्त आंगवर 'शेवाळं' येवाणं बाकी शे!..

rains long.jpg
rains long.jpg

मालेगाव : यंदा चांगल्या पावसाच्या गोड कौतुकात बळीराजासह सर्वच सुखावले.. आगामी वर्षात दुष्काळी चिन्ह पुसण्यास हा पाऊस कारणी लागेल हा या कौतुकाचा केंद्रबिंदू.. मात्र इतक्या पावसाच्या दीर्घ मुक्काम झेलण्याची मानसिक तयारी नसल्याने वैतागावस्था बघावयास मिळत आहे. शहरी ग्रामीण भागासह शेतमळ्यात आता पावसाला निरोप देण्याची एकतर्फी घाई व्यक्त होत आहे. कसमादे भागात तर "आते फक्त आंगवर 'शेवाळं' येवाणं बाकी शे" असं पावसाचे मिश्किल वर्णन ऐकावयास मिळत आहे.

लांबलेल्या पावसाने ग्रामीण-शहरी जनजीवन वैतागले

दुष्काळ आणि कसमादे ही गेल्या अनेक दशकाची ओळख पुसून टाकणारा पाऊस यंदा बरसला आहे. भूगर्भातील पाण्याची सर्वोच्च पातळी सध्या अनुभवली जात आहे. आगामी तीन चार वर्षे दुष्काळमुक्त जीवन अनुभवता येईल असा आशावाद शेतकरी आणि कामगार वर्गाकडून व्यक्त होत आहे. या आशावादी मानसिकतेत आता थेट दिवाळीपर्यंत दिर्घ मुक्कामी थांबलेल्या पावसामुळे कंटाळवाणी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हातातोंडाशी आलेले खरीप पीक अक्षरशः मातीमोल झाले आहे. घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड कशी करावी आणि आगामी रब्बीची पूर्वतयारी या प्रश्नाच्या गर्तेत बळीराजा गुरफटला आहे. पाऊस जराही उसंत देत नसल्याने दोन्ही हंगामावर पाणी तर सोडावे लागणार नाही ना अशी भीती व्यक्त होत आहे. 

लांबलेल्या पावसामुळे उमटल्या उपरोधिक व मिश्किल प्रतिक्रिया 

खरिपाच्या उत्पन्नाच्या भिस्तीवर आगामी पीक नियोजन करणारा शेतकरी दीर्घ मुक्कामी पावसामुळे हतबल झाला आहे. नद्या, नाले, विहिरी, बोअरवेल पाण्याने तुडुंब भरले आहेत. पाण्याचा निचरा होऊन जमीन कसण्यायोग्य होण्याची वाट शेतकरी बघत आहेत, मात्र ठराविक अंतराने पाऊस जमिनीतील पाणी निचरा होऊच देत नाही. जमिनीसह अंगावर शेवाळ येते की काय अशी उपरोधिक आणि मिश्किल प्रतिक्रिया सध्या उमटत आहे. ओल्या दुष्काळाची ही चिन्हे शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटत आहे. खरिपाचे पीक सडल्याने चाऱ्याचा प्रश्न उग्र रूप धारण करणारा ठरणार आहे. शेती योग्य व दुभती जनावरे पोसायची कशी असा प्रश्न भेडसावू लागला आहे. शेतीपूरक उद्योगाला या पावसाचा मोठा फटका बसू लागला आहे. यंदा चांगल्या पावसाच्या कौतुकात रमलेला शेतकरी आता दोन्ही हंगाम वाया जाणार या भीतीने धास्तावला आहे. शहरी व निम्न शहरी भागात सूर्यदर्शनाभावी रोगराईत वाढ झाली आहे.

प्रतिक्रिया

पावसाचा सामना करण्यासाठी केलेले उपाय आता तोडके पडत आहेत. भौतिक सुविधांची जमवाजमव केली नसल्याने शेतीच्या उत्पन्न हातचे निघून गेले आहे. - किशोर निकम, शेतकरी 

पावसाचे सुचिन्हे सुखावणारी आहेतच, मात्र पावसामुळे यंदाचे दोन्ही हंगाम आणि फळबाग शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कर्जाचा वाढलेला बोजा अस्वस्थ करत आहे.- प्रमोद निकम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com