मुख्यमंत्री भाजपकुमार थापाडे- राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

नाशिकमधील अनेक रस्त्यांच्या निविदा 2013 मध्ये निघाल्या. त्या वेळी रस्त्यांची कामे झाली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप सरकारच्या माध्यमातून कामे झाल्याचे सांगतात,' असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

नाशिक - "भारतीय जनता पक्ष हा थापाडा पक्ष असून, आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटत आहे,' अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज जाहीर सभेत केली. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी भाजपला मुख्य लक्ष्य करत इतर विरोधकांवरही टीकास्त्र सोडले.

नाशिक महापालिकेमध्ये नागरिकांनी सत्ता दिल्याने मागील पाच वर्षांमध्ये अनेक चांगली कामे केल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले, ""भाजपला पर्यायी शब्द थापा असा आहे आणि मुख्यमंत्री भाजपकुमार थापाडे आहेत. नाशिकमध्ये महापालिकेच्या माध्यमातून मनापासून काम केले. पाच वर्षांमध्ये येथे भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. कोणत्याही अधिकाऱ्यावर दबाव आणला नाही. निविदांच्या माध्यमातून पैसे खाण्याची मला सवय नाही. बाकीच्या पक्षांना फक्त ओरबाडून पैसे खायचे आहेत. भ्रष्टाचार करू न दिल्याने अनेकांनी पक्ष सोडला. भाजपने त्यांच्यासमोर पैसे फेकले.''

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात असताना नाशिक महापालिकेला आयुक्त देण्यात आला नाही. मात्र तरीही नाशिक महापालिकेने चांगले काम केले, असे राज ठाकरे यांनी सांगितले. "मोठमोठ्या कंपन्यांच्या सीआरएस फंडातून नाशिकमध्ये अनेक कामे झाली आहेत. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या उपलब्ध आहेत. या गाड्या नेमक्‍या कोणकोणत्या भागांत त्यावर जीपीएसच्या माध्यमातून नजर ठेवली जाते.

नाशिकमधील अनेक रस्त्यांच्या निविदा 2013 मध्ये निघाल्या. त्या वेळी रस्त्यांची कामे झाली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप सरकारच्या माध्यमातून कामे झाल्याचे सांगतात,' असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Web Title: Raj Thackeray rally in nashik