शासनाने शेतकऱ्यांवर आत्महत्या लादली - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव - केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. निसर्गाच्या अवकृपेमुळे नव्हे, तर शासनाने चुकीचे निर्णय घेतल्याने आत्महत्येची परिस्थिती त्यांच्यावर लादली गेली. शेतकऱ्यांनी आता या व्यवस्थेविरुद्ध एकजुटीने बंड करावे, तरच खऱ्या अर्थाने समस्या सुटतील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे व्यक्त केले.

शेतकरी सन्मान यात्रा जळगावात पोहोचल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की शासनाने मोठ्या प्रमाणात डाळी आयात करण्यास सूट दिली. त्यामुळे तूरडाळ, हरभरा डाळ यांचे भाव पडले. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पामतेल आयात केल्याने सोयाबीनचे भाव गडगडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे त्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही. शासनाने डाळी व तेलाच्या निर्यात धोरणाबाबत तातडीने निर्णय घेतले नाहीत. तसेच भाव गडगडल्यानंतर शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे हे मानवनिर्मित संकट या शासनाने शेतकऱ्यांवर अक्षरशः लादले आहे. 

नोटाबंदी, जीएसटीचा फटका
खासदार शेट्टी म्हणाले, की सरकार नोटाबंदी केल्याने सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार रोखीने होतात. त्यामुळे नोटाबंदीत त्याच्या व्यवहारावर मर्यादा आल्या. त्यात जीएसटी लागू करण्यात आला. शेतकऱ्याने शेतीसाठी खरेदी केलेल्या वस्तूंवर जीएसटी लागू होतो. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीवर जीएसटी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही परतावा मिळत नाही. परिणामी त्याचा उत्पादन खर्च वाढतो आणि शेतकरी कर्जबाजारी होतो, असे सध्याचे चित्र आहे. 

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेनेने शेतकरी कर्जमाफी तसेच इतर प्रश्‍नांवर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन केले होते. सत्तेत असलेला भाजप शेतकऱ्यांबाबत काहीच करीत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर युती न करता स्वतंत्र लढण्याची भाषा शिवसेनेने केली होती. आता विधानपरिषदेसाठी त्यांनी युती केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे आपले लक्ष राहणार आहे, खासदार शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: raju shetty talking on farmer suicide