
Rajwadi Holi Kathi : ब्रॅन्डिंगसह पर्यटनदृष्ट्या दर्जेदार सुविधा निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. गावित
Nandurbar News : सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे साडेबाराशे वर्षांची परंपरा असलेली काठी संस्थानची होळी पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करून साजरी केली जाते.
परिसरातील लाखो आदिवासी बांधवांसाठी हा एक महत्त्वाचा उत्सव असतो. (rajwadi holi kathi 2023 Guardian Minister Dr Gavit statement about create tourism quality facilities dhule news)
पुढील वर्षापासून या राजवाडी होळीचे पर्यटनदृष्ट्या ब्रॅन्डिंग तसेच होळीसाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
काठी (ता. अक्कलकुवा) येथे प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेचे सदस्य सी. के. पाडवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी गावित, किरसिंग पाडवी, नागेश पाडवी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की रात्रभर पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधव समूहनृत्य करून आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवितात. काठीला जाणाऱ्या रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी होते. रस्त्याच्या दुतर्फा जाणारे अनेक समूह काठीच्या दिशेने
जात असतानाही समूहनृत्य करतात. होळीच्या काळात आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा आहे. या काळात नवस फेडणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्न ग्रहण करीत नाही. खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही. पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. होळी प्रज्वलित होईपर्यंत त्यांचे नाचणे व गाणे ही दिनचर्या सुरू असते.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
ते पुढे म्हणाले, की आदिवासी बांधवांना होलिकोत्सवासाठी विविध वस्तूंची आवश्यकता असते. या वस्तूंची खरेदी करण्यासाठी होळी उत्सवाच्या आठवडाभर आधी परिसरात जो बाजार भरतो त्याला भोंगऱ्या बाजार असे म्हटले जाते. या बाजारात होलिकोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंबरोबरच चांदीच्या
वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. घरासाठी लागणारी इतर सामग्री खरेदी केली जाते. उत्सव भोंगऱ्या बाजारापासून सुरू होतो, तो रंगपंचमीला संपतो.
जिल्ह्यात सर्वांत मोठा भोंगऱ्या बाजार धडगाव व फलई येथे भरतो. येथील भोंगऱ्या बाजार प्रसिद्ध आहे. या बाजाराला महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थानमधून अडीच-तीन लाख लोक येतात. या कालावधीमध्ये परस्परांच्या घरी जाणे, नवस फेडणे, नातेवाइकांच्या भेटी होत असतात, असेही मंत्री डॉ. गावित यांनी नमूद केले.
वैशिष्ट्यपूर्ण राजवाडी होळी
घुंगरू, टोप, ढोलकी, मोठा ढोल, मोरपिसांची बासरी, शस्त्र असा पारंपरिक साज परिधान केलेले आदिवासी समूह रात्रभर एकाच तालावर ढोल, बिरी, पावा, घुंगरांच्या सुमधुर आवाजात तालबद्ध पद्धतीने होळीच्या चुहूबाजूंनी फेर धरून, जोरकस गिरक्या घेत पारंपरिक नृत्य करतात. साऱ्या वाद्यांच्या आवाजात संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण करणारी नृत्ये मंत्रमुग्ध करतात.
या वेळी आदिवासी बांधवांच्या हातात धाऱ्या, तिरकामठे, कुऱ्हाड, बर्ची (शस्त्र) असतात. चेहऱ्यावर विविध प्राण्यांचे मुखवटे लावतात. हातामध्ये ढोल, पिपरी, पावरी, बासरी आदी वाद्यांनी परिसर दुमदुमून जातो.
पहाटेच्या वेळी प्रज्वलित होणारी होळी आणि तेथे जमलेले नागरिक, एका सुरातालात होत असलेले नृत्य या सर्व बाबी विहंगम दिसतात. तो क्षण डोळ्यात साठवणे हा एक विलक्षण अनुभव असतो, असेही या वेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.