‘मेगा रिचार्ज स्कीम’च्या कामाचा पाठपुरावा

raksha-khadse
raksha-khadse

जळगाव - संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रासोबतच मध्य प्रदेशातील काही भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी तापी महाकाय जलपुनर्भरण योजनेच्या कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येईल. योजना भव्य असल्यामुळे तिचे काम आठ- दहा वर्षे चालेल. मात्र, किमान या वर्ष-दोन वर्षांत ते सुरू व्हावे, असा आपला प्रयत्न राहीन, अशी ग्वाही रावेर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांनी दिली. खासदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी आज ‘सकाळ’च्या ‘एमआयडीसी’तील मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी त्यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमांतर्गत आगामी पाच वर्षांतील कामाचा ‘अजेंडा’ काय असेल, याचे ‘रोडमॅप’ सादर केला. प्रारंभी निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रश्‍न : महत्त्वाकांक्षी ‘मेगा रिचार्ज स्कीम’चे स्टेटस काय आहे?
रक्षा खडसे :
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मेगा रिचार्ज स्कीमचा पाठपुरावा सुरू आहे; परंतु गेल्या पाच वर्षांत या कामास गती मिळाली. तत्कालीन केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी योजनेची हवाई पाहणी केली, नंतरच्या टप्प्यात रडार सर्व्हेक्षण होऊन कामास चालना मिळाली. चोपड्यापासून रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर व थेट मध्य प्रदेशापर्यंत लाभदायी ठरणारी ही योजना खूप मोठी आहे. त्यामुळे योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी दहा वर्षे तरी लागतील. मात्र, सद्य:स्थितीत योजनेच्या कामाचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात असून, येत्या वर्षभरात, किंवा दोन वर्षांत या योजनेचे काम सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न असेल, असे श्रीमती खडसे यांनी सांगितले. 

प्रश्‍न : अन्य सिंचन प्रकल्पही रखडलेले आहेत?
रक्षा खडसे :
तापी नदीवरील शेळगाव, पाडळसे हे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी दोन्ही खासदार मिळून पाठपुरावा करू. बोदवड, कुऱ्हा व वरणगाव उपसा सिंचन योजनांची कामे मार्गी लागलीत. बोदवड योजनेचे काम गेल्या पाच वर्षांत बऱ्यापैकी काम झाले आहे. जे प्रकल्प रखडले आहेत, ते राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण कसे होतील, यासाठी स्थानिक आमदारांसोबत प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांच्या संदर्भात ११ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. 

प्रश्‍न : हतनूरमधील गाळाचा प्रश्‍न गंभीर आहे, त्याबद्दल काय?
रक्षा खडसे :
हतनूर प्रकल्पात ६० टक्के गाळ आहे, त्यामुळे त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. तापीला आलेल्या पुराचे पाणी वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी हा गाळ काढून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते. प्रत्यक्षात गाळाचे प्रमाण प्रचंड असल्याने तो काढणे शक्‍य नाही. त्यात दरवर्षी भरच पडत आहे. संपूर्ण गाळ काढण्यास जेवढा खर्च लागेल, त्यात दुसरे धरण होऊ शकते. 

प्रश्‍न : रस्ते विकास, चौपदरीकरणाचे काम कुठपर्यंत झाले?
रक्षा खडसे :
महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. तरसोद- चिखली काम येत्या आठ- दहा महिन्यांत पूर्ण होईल. तुलनेने फागणे- तरसोद टप्प्यातील काम संथगतीने होत आहे. मक्तेदार एजन्सीची ती समस्या असून, ते कामही सुरू झाले आहे. पहूर- जामनेर- बोदवड- बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुहेरीकरणाच्या कामाला आगामी काळात गती देण्यात येईल. अंकलेश्‍वर- बऱ्हाणपूर रस्त्यावर वाहतूक प्रचंड आहे, या रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळाला असून, त्याच्या चौपदरीकरणासाठी सर्व्हेक्षण सुरू आहे. भूसंपादन व अन्य प्रक्रिया होऊन काम मार्गी लागण्यास दोन वर्षे लागतील. मात्र, तोवर या रस्त्याचे रुंदीकरण, दुरुस्ती करण्याचा प्रयत्न आहे. 

प्रश्‍न : केळी उत्पादकांना नुकसानीतून न्याय कसा मिळेल?
रक्षा खडसे :
पीकविमा योजनेशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. हेक्‍टरी सहा हजार रुपये भरावे लागत असले तरी त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. नैसर्गिक आपत्तीवर कुणाचे नियंत्रण नसते, मात्र त्यामुळे होणारे नुकसान विम्यातून भरून निघते. त्यामुळे प्रत्येकाने पीकविमा काढलाच पाहिजे. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना करपा निर्मूलनासाठी योजना आणली होती, त्या योजनेची माहिती घेऊन ती नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

प्रश्‍न : रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न असतील?
रक्षा खडसे :
मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये कौशल्य विकास योजनेवर भर दिला. मात्र, योजनेत अनेक बोगस अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे ‘रिझल्ट’ मिळू शकला नाही. या टर्ममध्ये कौशल्य विकास योजनेत सुधारणा करण्यासंबंधी आपण सूचना मांडणार आहोत. स्थानिक गरजा ओळखून, त्यादृष्टीने उद्योग व व्यवसाय सुरू होण्यासंबंधी कौशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करू.

मुलगीही म्हणते, ‘अपॉइंटमेंट घेऊ का?’
काहीवेळा मुलांच्या शाळेतील उपक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे मुले नाराज होतात. क्रिशिकाच्या (मोठी मुलगी) शाळेतील दोन कार्यक्रमांना जाऊ शकली नाही, एके दिवशी मतदान होते, तर २३ मेस निकालाच्या दिवशी दुसरा कार्यक्रम होता. त्यामुळे ती नाराज झाली. आता ३ जूनला तिचा ‘कथ्थक’चा परफॉर्मन्स होता. त्याआधीच तिने सांगितले, ‘या कार्यक्रमाला तरी ये, डायरीत लिहून ठेव.. नाहीतरी तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागते..’ हा अनुभव विशद करत कुटुंबाकडे काहीवेळा दुर्लक्ष होत असल्याची खंतही  व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com