चांगला पाऊस, विश्‍वशांतीसाठी मागितली ‘दुआ’

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 6 जून 2019

बिलाल ट्रस्टतर्फे रोपांचे वाटप
ईदनिमित्त हजरत बिलाल ट्रस्टतर्फे शिवाजीनगर येथील क्रांती चौक, अमन चौक, मिर्जा चौक आदी ठिकाणी एक हजार रोपांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष अकील पहेलवान यांनी केले. तसेच संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

जळगाव - रमजान ईदच्या पावनपर्वावर शहरातील ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर आज हजारो मुस्लिम बांधवांनी ‘ऐ अल्लाह पाणी बरसा दे, जमी को खुशहाल बना दे’ अशी विनवणी करीत विश्‍वशांती, सुख-समृद्धी नांदावी, यासाठी अल्लाहकडे ‘दुआ’ मागितली. सामूहिक नमाजपठणानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अालिंगन देत ‘ईद मुबारक’ म्हणून शुभेच्छा दिल्या. तसेच शहरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला.

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आज उत्साहात साजरा झाला. ईदगार ट्रस्टतर्फे ईदगाह मैदानावर मौलाना कासमी यांनी नमाज अदा केली, तर मुफ्ती आतिक उर रेहमान यांनी प्रवचन दिले.

अध्यक्ष हाजी गफ्फार यांनी ट्रस्टच्या पुढील कामांची माहिती दिली, तर मानद सचिव फारुख शेख यांनी आढावा घेतला. शहरात ईदनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. ईदच्या सामूहिक नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, सहाय्यक पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, पोलिस निरीक्षक रणजित शिरसाट यांनी मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिरखुर्म्याचा आस्वाद घेण्यासाठी ठिकठिकाणी नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक, मित्रमंडळीस आमंत्रित केले गेले. नमाज पठणानंतर ‘सामूहिक दुआ’ कार्यक्रम झाला. पोलिस दलातर्फे चोख बंदोबस्त असल्याने मुस्लिम संघटनांनी पोलिस दलाचे आभार मानले. 

सुन्नी ईदगाह ट्रस्टतर्फे ‘दुआ’ 
सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे अजिंठा रोडवरील सुप्रिम कॉलनीतील ईदगाह मैदानावर ईद-उल- फित्र (रमजान ईद) साजरी झाली. यानिमित्त सकाळी साडेनऊला सुन्नी मशीद नियामतपुराचे पेश इमाम मौलाना जुबेर रजवी यांच्या नेतृत्वात ट्रस्टचे अध्यक्ष अयाजअली नियाजअली यांनी नमाज अदा केली. तारिका-ए-नमाज (नमाजची पद्धत) मौलाना नजमूल हक यांनी सांगितली, तर मौलाना मुफ्ती रेहान रजा यांनी प्रवचन तर सलातो सलाम मौलाना जुबेर आलम यांनी म्हटले. नमाज अदा करून देशात सुख-समृद्धी राहून देश महासत्ता होण्यासह विश्‍वशांती व पाऊस पडण्याचीही प्रार्थना समाजबांधवांतर्फे करण्यात आली. याप्रसंगी अयाज अली नियाज अली, जाबीर रजा अशरफ, मौलाना जुबेर आलम आदी आठ हजार सुन्नी बांधव मैदानावर उपस्थित होते.

हिंदू- मुस्लिम बांधवांतर्फे ‘गो सेवा’
रमजान ईदनिमित्त ॲड. विजय काबरा यांच्या आवाहनानुसार नमाज अदा केल्यानंतर हिंदू व मुस्लिम बांधवांनी पांझरपोळ येथे गो सेवा केली. यावेळी चारा, लाप्सी देऊन गो सेवा केली. तसेच ॲड. काबरा यांनी बकरी ईदला देखील गो-सेवा करण्याचे आवाहन केले. यावेळी जहाँगीर पेंटर, राकिब शेख, मुक्तार शेख, आजम शेख, जफर शेख, इमरान शेख आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramjan Ied Namaj Pathan Rain World Peace Prayer Muslim