ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांचे धुळ्यात निधन 

धनंजय सोनवणे
शनिवार, 31 मार्च 2018

वारसा मुलांकडे
या सर्व प्रवासात त्यांना पत्नी माजी आमदार (कै.) गोजरताई भामरे यांचे सहकार्य लाभले. आज त्यांचे सुपुत्र संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, विद्या विकास मंडळ, दादासाहेब रामराव पाटील बँकेचे अध्यक्ष व भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील हे वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. 

साक्री : धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा राहिलेले जेष्ठ नेते रामराव सीताराम पाटील (वय 92) यांचे आज सकाळी सहाला धुळे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने झाले. त्यांचे शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकिय क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. त्यांच्यावर दुपारी पाचला मालपूर या जन्मगावी अंत्यसंस्कार होतील. 

ते संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे आणि भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील यांचे वडिल होत. मालपूर (ता. साक्री, जि. धुळे) येथे 21 जानेवारी 1926 ला रामराव पाटील यांचा जन्म झाला. ते रामरावदादा याच नावाने सर्वपरिचित झाले. मालपूरला प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर धुळे येथील जो. रा. सिटी हायस्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. 

लढाऊ नेते
सुरुवातीपासून डाव्या विचारसारणीने वाटचाल केलेल्या रामरावदादांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 ला सर्वप्रथम राष्ट्र सेवा दलात सहभागी होत समाजकारणास सुरुवात केली.  स्वातंत्र्यानंतर 1957 ला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होताना विविध आंदोलने करीत रामरावदादांनी अखंड महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लढा दिला. दुष्काळी विरोधी लढा, उकई धरण विरोधी लढा, असे अनेक लढे त्यांनी उभारले. 

समाजकारणातही सक्रीय
रामरावदादांनी साक्रीतून राजकारणात प्रवेश करत 1962 ला जिल्हा परिषदेत  निवडून येत बांधकाम समिती सभापती पद भूषवले. याच काळात 1964 ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आदिवासीबहुल साक्री तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 1970 ला विद्या विकास मंडळाची स्थापना केली. यात सी. गो. पाटील महाविद्यालयासह साक्री तालुकाभरात शैक्षणिक संस्थेचे जाळे विस्तारले. दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले. यासोबतच 1976 ला जनता सहकारी बँकेची स्थापना करून नागरिकांना आर्थिक मदतीचा हातभार लावला. तालुक्याचे वैभव ठरलेल्या पांझरा- कान सहकारी साखर कारखान्याचे रामरावदादांनी 1978- 83, 1986- 91 व 1997, असे तीनवेळा अध्यक्षपद भूषवले.

बहुमोल योगदान
दरम्यानच्या काळात शेती पद्धतीत अमुलाग्र बदल करत असताना ब्राझील तसेच इस्त्राइलचे अभ्यास दौरे देखील केले. साक्री तालुका दुध उत्पादक कृषीपूरक सहकारी संस्थेची स्थापना, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्षपद, प्रदेश काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष आदी विविध पदे भूषवताना तालुका व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी बहुमोल योगदान रामरावदादांनी दिले. 

वारसा मुलांकडे
या सर्व प्रवासात त्यांना पत्नी माजी आमदार (कै.) गोजरताई भामरे यांचे सहकार्य लाभले. आज त्यांचे सुपुत्र संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, विद्या विकास मंडळ, दादासाहेब रामराव पाटील बँकेचे अध्यक्ष व भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील हे वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. 

रामरावदादा यांचा जीवनपट
1942 – राष्ट्रसेवा दलात सहभाग
1948 – माजी आमदार (कै.) गोजरताई भामरे यांच्याशी विवाह
1957 – संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग
1961 - उकाई धरण विरोधी मोर्चाचे नेतृत्व
1962 – चीनी आक्रमणासंदर्भात परखड विचार मांडल्याबद्दल 11 महिने कारावास
1962 ते 67– धुळे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती
1964 – कॉंग्रेसमध्ये प्रवेश
1970– विद्या विकास मंडळाची स्थापना
1972 – दुष्काळी विरोधी मोर्चाचे नेतृत्व
1976 – जनता सहकारी बँकेची स्थापना
1976 – साक्री तालुका दुध उत्पादक कृषीपूरक सहकारी संस्थेची स्थापना
1983 ते 89 – धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष
1985 ते 89 – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक विभागीय अध्यक्ष
1985 ते 90 – धुळे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष
1990 – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस किसान सेलचे अध्यक्ष

Web Title: Ramrao Sitaram Patil passed away in Dhule