दानवे, सावे आले कोणी नाही पाहिले..! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज झाल्यानंतर भाजपअंतर्गत स्पर्धा लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्पर्धा अधिकच तीव्र होत असताना रविवारी (ता. 23) भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

नाशिक -  गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज झाल्यानंतर भाजपअंतर्गत स्पर्धा लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्पर्धा अधिकच तीव्र होत असताना रविवारी (ता. 23) भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

दानवे यांच्या नाशिक भेटीची कानोकान खबर भाजपच्या स्थानिक नेत्यांना नव्हती. आमदार तर सोडाच प्रोटोकॉलप्रमाणे शहराध्यक्षांना प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याची माहिती नव्हती; परंतु पाटील यांनी भेटीचे स्वतःच छायाचित्रे व्हायरल केल्यानंतर दानवे शहरात आल्याचे समजले. जसे दानवेंनी, "मी नाशिकमध्ये आल्याचे कळविले नाही' तसे आमदार व पदाधिकाऱ्यांनीदेखील आम्हाला काहीच माहीत नसल्याचे दाखवत संपर्क केला नाही. दिनकर पाटील यांच्याकडून व्हायरल झालेले छायाचित्र नक्की खरे आहे का? की जुने व्हायरल झाले, याची शहानिशा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर छायाचित्रामध्ये उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांचाही सत्कार पाटील यांच्याकडून होत असल्याचे निदर्शनास आले. सावे गेल्या आठवड्यातच मंत्री झाले आहेत. त्यामुळे पाटील यांच्या छायाचित्रावर शंका घेणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावर कटू भाष्य टाळले. एक मात्र नक्की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांच्या निवासस्थानी दानवे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी भेट दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये भीतीचा गोळा उठला. विधानसभेसाठी इच्छुक असलेले पाटील यांचे पक्षात पारडे जड झाल्याचे मानले जात आहे. दानवे, सावे यांच्या भेटीच्या चर्चेदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांचे चेहरे पडलेले दिसले. दरम्यान, पाटील कुटुंबीयांतर्फे दानवे तसेच उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांचे स्वागत करण्यात आले. दिनकर पाटील यांच्यासह माजी नगरसेविका लता पाटील, यश कटाळे, कैलास पाटील आदी उपस्थित होते. 

सानपांना खबर नाही 
पूर्वचे आमदार व भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना विचारणा केली असता, छायाचित्रावरून दानवे साहेब आल्याचे दिसते; परंतु प्रोटोकॉलप्रमाणे आमदार, शहराध्यक्षांना माहिती देणे आवश्‍यक होते. तशी कुठलीच माहिती अद्यापपर्यंत मिळाली नसल्याचे सानप यांनी सांगितले. पाटील यांनी रस्तेमार्गाने जालना येथे जात असताना नाशिकमध्ये निवासस्थानी येत असल्याचे दानवे यांचा अचानक दूरध्वनी आल्याचे पाटील यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Danve meet Dinkar Patil