उत्तरप्रदेशातील तरुणीवर चाळीसगावात अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

बहिणीशी झालेल्या भांडणातून रागातून घरातून निघून गेलेल्या उत्तर प्रदेशातील १७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना चाळीसगावात घडली.

चाळीसगाव -  बहिणीशी झालेल्या भांडणातून रागातून घरातून निघून गेलेल्या उत्तर प्रदेशातील १७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना चाळीसगावात घडली. याप्रकरणी संशयित तरुणाच्या विरोधात चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

या घटनेची माहिती अशी, इसारी सलीमपूर (जि. बलीया, उत्तरप्रदेश) येथील मूळ रहिवासी असलेली १७ वर्षीय तरुणी आपल्या बहिणीकडे भिवंडी येथे राहत होती. मागील महिन्यात बहिणीशी तिचा काही कारणांवरून वाद झाला. रागाच्या भरात ही तरुणी घराबाहेर पडली व तिने थेट रेल्वे स्टेशन गाठले. रेल्वेने चाळीसगावकडे येत असताना रेल्वेत तिची ओळख येथील एका महिलेशी झाली. महिलेने ही मुलगी एकटीच आहे, असे समजून आपुलकीने तिला चाळीसगाव येथील रेल्वे स्टेशनजवळील आपल्या घरी नेले. ही तरुणी घरात असताना महिलेचा मुलगा संशयित श्रीयुग जाधव याने २६ सप्टेंबरला दुपारनंतर लग्नाचे आमिष दाखवून या मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारामुळे हादरलेल्या या पीडित मुलीने शहर पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांना ती काहीच सांगत नसल्याने शहर पोलिसांनी तिची रवानगी जळगाव येथील बाल सुधारगृहात केली. तेथे चौकशी केल्यानंतर पीडित तरुणीने आपल्यावर कशा प्रकारे अत्याचार झाला, याचा जबाब दिला. या जबाबाचा व चौकशीचा अहवाल बाल सुधार गृहाकडून शहर पोलिसांना टपालाने प्राप्त झाल्यानंतर काल (१४ ऑक्टोबर) रात्री उशिरा पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात श्रीयुग जाधवच्या विरोधात बाल लैंगिक संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape case in chalisgaon