काळा बाजारात जाणारा रेशनचा माल पकडला; पून्हा चोरीला गेला आणि पोलिसांनी पकडला  

भरत बागुल | Friday, 25 December 2020

रेशनिंगचा माल नदीपलीकडे असलेल्या भातोजी महाराज मंदिराच्या मागे असलेल्या एका खोलीतून गुरुवारी जप्त केला.

 पिंपळनेर : येथील रेशनिंगचा गहू, तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जाणारा पिक-अप गाडी अपर तहसीलदार विनायक थविल यांनी पकडली होती. पंचनामा केलेली पिक-अप गाडी चालकाने रात्री पळवून नेली होती. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बारा तासांच्या आत गहू, तांदूळ गाडीसह जप्त केला आहे. 

धुळ्याची महत्वाची बातमी- शेतकऱ्यांची एकजूट फलदायी; वीस गावांचे ८२ ‘अपील’ मागे 

महात्मा फुले चौकातील रेशन दुकान क्रमांक १३ मधील ३५ गोण्या गहू व एक गोणी तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी वाहनातून (एमएच १८, एए ४३१२) नेत असताना, अपर तहसीलदार विनायक थविल यांनी पकडला होता. पुरवठा निरीक्षक बागूल यांनी रात्री पंचनामा केला होता. मात्र, वाहनचालक चावी घेऊन फरारी झाला होता.

Advertising
Advertising

आणि गाडी देखील गायब

वाहन पंक्चर असल्याने व वाहनाची चावी नसल्याने रात्री वाहन तेथेच होते. रात्री दीड ते दोनच्या सुमारास वसीम शकील पटेल (रा. पिंपळनेर) रेशन दुकानदाराच्या सांगण्यावरून मालासह गाडी घेऊन फरारी झाला होता.

 

मंदिराच्या मागील खोलीतून धान्य जप्त

याबाबत पुरवठा निरीक्षक श्रीमती बागूल यांनी बुधवारी (ता. २३) पोलिसांत फिर्याद दिली होती. नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र केदार यांनी १२ तासांच्या आत रेशनिंगचा माल नदीपलीकडे असलेल्या भातोजी महाराज मंदिराच्या मागे असलेल्या एका खोलीतून गुरुवारी जप्त केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रवींद्र केदार व भूषण हांडोरे, हवालदार भूषण वाघ, चेतन सोनवणे, देवेंद्र वेंदे, माधुरी हटकर यांनी केली. घटनास्थळी पुरवठा निरीक्षक बागूल यांना बोलवून पंचनामा केला. शहानिशा करून पिंपळनेर पोलिसांनी गहू व तांदूळ ताब्यात घेतला. माल काळ्या बाजारात नेण्यासाठी वापरलेले वाहन व चालकाचा शोध पिंपळनेर पोलिस घेत आहेत.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे