स्वस्त धान्य दुकानांमधून सर्रास मिळते कमी धान्य!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

अमळनेरला मला एका दुकानात धान्य कमी देण्याचा प्रकार दिसला. त्यावर मी लगेच कारवाई केली. ग्राहकांनी जर लिखित स्वरूपात संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराबाबत तक्रारी दिली, तर त्याचे नाव गोपनीय ठेवून संबंधित दुकानावर कारवाई करू.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

जळगाव - शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सर्वच स्वस्त धान्य दुकानांतून ग्राहकांना अर्धा ते एक किलो धान्य मिळते. हे धान्य काळ्या बाजारात विकले जाते. याबाबत ग्राहकही जागरूक नाहीत अन्‌ पुरवठा विभाग तक्रार आल्याशिवाय कारवाई करू शकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना काळ्या बाजारात धान्य विकण्यास मोकळे रानच मिळाले आहे. दरम्यान, ‘रेशन’चा माल कमी मिळत असल्याबाबत जळगाव जिल्हा रेशन धान्य दुकानदार असोसिएशनतर्फे नकार देण्यात आला आहे.

स्वस्त धान्य दुकानांतील कारभार सर्वश्रुत आहे. मात्र, तो सर्वसामान्यांना दिसून येत नाही. बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील नागरिकांनाच स्वस्त धान्य दुकानांतून माल मिळतो. मात्र, त्यातही स्वस्त धान्य दुकानदार माल देताना ‘कात्री’ लावतात. पॉस मशिनवर संबंधित शिधापत्रिकाधारकाचा अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतर माल दिला जातो. मात्र, ग्राहकाला किती माल दिला, याचे बिल दिले जात नाही. सोबतच निर्धारित किलोप्रमाणे धान्यही मिळत नाही. पैसेही अधिकचे घेण्याचे प्रकार स्वस्त धान्य दुकानांमध्ये सर्रास सुरू आहेत. याबाबत ग्राहकांची चुप्पी असते.

कारण, स्वस्त धान्य दुकानदाराबाबत तक्रार केली, तर तो पुढील वेळी तक्रारदारास धान्य देणार नाही, अशी भीती त्याच्या मनात असते. स्वस्त धान्याची तर गरज शिधापत्रिकाधारकाला असल्याने तो मिळेल तेवढे धान्य घेऊन मोकळा होतो.

स्वस्त धान्य दुकानदार याचा फायदा घेत तो माल काळ्या बाजारात नेला जातो. यामुळे शासनाचे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाही, पोचले तरी ते प्रमाण कमी असते. यामुळे स्वस्त धान्य दुकानांतील मालाच्या काळा बाजाराला ‘लगाम’ लावणार कोण, असा प्रश्‍न कायमच आहे.

शिधापत्रिकेच्या ‘आधार’ सिंडिंगमध्ये चुका आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेवरील जेवढ्या सदस्यांचे ‘आधार’ सिंडिंग झाले, तेवढ्याच सदस्यांचे धान्य दिले जाते. ज्या सदस्यांचे आधार कार्ड जोडले गेले नाही, त्याचे धान्य आम्हाला मिळत नाही. ‘आधार’ सिंडिंगमधील चुका दुरुस्त कराव्यात.
- जमनादास भाटिया, अध्यक्ष, जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ration Shop Grain Issue