खडसेंभोवती फिरतेय राजकारण

Raver-Constituency
Raver-Constituency

लेवाबहुल रावेर मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे निर्विवाद वर्चस्व आहे. पण खडसेंना भाजपने अडीच वर्षांत न्याय दिला नसल्याने नाराजी आहे. दुसरीकडे त्यांच्या स्नुषा रक्षा यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात या मतदारसंघाचा अद्याप निकाल लागलेला नाही. त्यामुळे अनिश्‍चिततेचे वातावरण असून, खडसेंच्या भूमिकेभोवती येथील राजकारण फिरत आहे. 

जातीय समीकरणात, रावेर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० टक्के मतदार लेवा समाजाचे, त्याखालोखाल मराठा आणि नंतर माळी, कोळी, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी आहेत. मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचाच उमेदवार निवडून येतो, हा इतिहास आहे. 

खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील गटबाजी लपून राहिलेली नाही. खडसेंना विविध आरोपांमधून निर्दोषत्व मिळूनही पक्षाकडून न्याय मिळालेला नाही. तशी खंत ते वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखवितात. अशा स्थितीत मतदारसंघातून रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारीची संधी मिळते की नाही, याबद्दलही चर्चा आहे. रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारली, तर भाजपपुढे माजी खासदार आणि रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांचे नाव समोर आहेच. अर्थात खडसेंच्या मदतीशिवाय या ठिकाणी कोणताही उमेदवार निवडून येणे अशक्‍य नसले तरी कठीण नक्कीच आहे. त्यामुळे भाजप रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारण्याची जोखीम घेणार का, हा प्रश्‍नच आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या समीकरणात हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचे वर्चस्व असूनही सध्या राष्ट्रवादीकडे आहे; परंतु राष्ट्रवादीकडे त्यासाठी सक्षम उमेदवार नाही. खडसे भाजपवर नाराज असल्याने त्यांच्या भूमिकेची राष्ट्रवादीला प्रतीक्षा आहे. रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली, तर त्यात बदल होण्याची शक्‍यताही नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी अथवा दुसऱ्या नावाचा विचार करावा लागेल. दुसरीकडे काँग्रेसने त्यावर दावा केला असून, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील त्यासाठी सज्ज आहेत.

२०१४ ची मतविभागणी 
रक्षा खडसे (भाजप) - ६,०५,४५२ (विजयी) 
मनीष जैन (राष्ट्रवादी) - २,८७,३८४ 

मतदारसंघातील प्रश्‍न 
    केळी निर्यातीसाठी वाहतूकव्यवस्था 
    सिंचन प्रकल्प पूर्ण होणे आवश्‍यक 
    तापी नदीवरील जलपुनर्भरण योजना कार्यान्वित होणे गरजेचे 
    जामनेरातील टेक्‍स्टाइल पार्कची घोषणा  हवेतच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com