'चांगला नागरिक होणे' हेच खरे करियर : ऍड.ललिता पाटील

भगवान जगदाळे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता महिला पतसंस्थेतर्फे 'जागर स्त्री शक्तीचा' या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. पतसंस्थेच्या अध्यक्षा उर्मिलाबेन शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता महिला पतसंस्थेतर्फे 'जागर स्त्री शक्तीचा' या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. पतसंस्थेच्या अध्यक्षा उर्मिलाबेन शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

व्यासपीठावर पतसंस्थेच्या उपाध्यक्षा शैलजा सोंजे, संचालिका योगिता शाह, संगीता जयस्वाल, आशाबाई सूर्यवंशी, वंदना शाह, राजश्री शाह, कविता शाह, मायाबेन शाह, स्नेहल राणे, मीराबाई मोहने, सल्लागार समिती सदस्या शोभा चिंचोले, वर्षा जाधव, प्रिया भदाणे आदी उपस्थित होत्या. म्हसाई मातेच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. संचालक मंडळातर्फे ऍड. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या उषा ठाकरे, प्राचार्य प्रकाश महाजन (अमळनेर), पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत शाह, संस्थेचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह, संचालक सुमंतकुमार शाह, भिकन जयस्वाल, ललित आरुजा, दुल्लभ जाधव, राजेंद्र राणे, रघुवीर खारकर, खुदाबक्ष शेख, अनिल सोंजे, धर्मराज चिंचोले, मधुकर बधान, सलीम पठाण, अय्युब खाटीक, दिलीप जाधव, नंदलाल मोहने, गणेश मोहने, मोहन सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

भाषणातील ठळक मुद्दे-
पुढे बोलताना ऍड. पाटील म्हणाल्या की, समाजाला चांगल्या डॉक्टर, इंजिनियर सोबतच चांगल्या व संस्कारक्षम नागरिकांचीही गरज आहे. दिवसेंदिवस संयुक्त कुटुंबपद्धतीचे विघटन होत असून वृद्धाश्रमांमध्ये गर्दी वाढत आहे. आपले आई-वडील वृद्धाश्रमांत जाऊ नये असे वाटत असेल तर सुनांनी आधी आपल्या सासू-सासऱ्यांचीही तेवढीच काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने संस्कार व स्वयंशिस्त लावून घेतल्यास शासनाला कायदे करण्याची गरजच भासणार नाही. परंतु कायदे करूनही आज स्त्री सुरक्षित नाही. ती स्वतःच्या घरातही सुरक्षित नाही. एवढेच काय तर ती आईच्या उदरातसुद्धा सुरक्षित नाही. निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. म्हणून हे जगच एक ब्युटी पार्लर आहे. बाह्य सौंदर्य खुलविण्यापेक्षा आंतरिक सौंदर्य खुलवा, आत्मसन्मान जपा. कुटुंबात आई-वडिलांचे स्थान केवळ फोटोपुरतेच उरले आहे. जीवनात केवळ पैसा कमावणे हाच जर एकमेव उद्देश असेल तर मुले जन्माला घालू नका. विवाहसंस्था मोडकळीस आणू नका. हेलन केलर अंध असूनही त्यांना हे जग सुंदर भासते. इंद्रधनुचे सप्तरंग समजतात. आपल्याला डोळे असूनही हे जग वाईटच दिसते. ज्ञानेश्वरांना समाजाने एवढा त्रास व यातना देऊन देखील त्यांनी ज्ञानेश्वरीत एकही शब्द समाजविरोधी लिहिला नाही. उलट 'अवघाची संसार सुखाने करीन' असा संदेश दिला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या घराच्या बाहेर असणाऱ्या चपलांची संख्या हेच खरे श्रीमंतीचे लक्षण आहे. आपल्या माणसांना जपा, त्यांना समजून घ्या. माणसे जोडायला शिका, जग आपोआप जोडले जाईल. मोबाईल, टीव्हीसारख्या इडियट बॉक्स पासून लांब रहा. आई-लेकरांमधील अंतर कमी झाले पाहिजे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतले पाहिजे. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे!' असे सांगणाऱ्या साने गुरुजींचा 'शाम' महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात व घराघरात पोहचला पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे. त्याचा आस्वाद घ्या. जगात पती-पत्नीचे नाते हेच एकमेव शाश्वत नाते आहे. ते जपा. आणि नात्यांची ही सुंदर मोत्यांची माळ गुंफून ठेवण्याची ताकद फक्त स्त्रीतच आहे. जर नाती जपली नाहीत तर भविष्यात जिकडेतिकडे मनोरुग्ण व मनोरुग्णालयांची संख्या वाढलेली दिसेल, असे विविधांगी व सर्वस्पर्शी मुद्दे त्यांनी आपल्या सलग दोन तासांच्या व्याख्यानात मांडलेत.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदी शूरवीर महिलांचे त्यांनी संदर्भ दिले. दरम्यान पतसंस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही यावेळी ऍड.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ऍड. पाटील यांचा परिचय व प्रास्ताविक पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत शाह यांनी केले. सूत्रसंचालन पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश जयस्वाल, मुख्याध्यापक मनोज भागवत यांनी केले. तर संचालिका वंदना शाह व रघुवीर खारकर यांनी आभार मानले. निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान व म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व संचालक मंडळ, मीडिया प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश जयस्वाल, कर्मचारी नारायण मोरे, जितेंद्र जाधव, जितेंद्र सोनवणे, भानुबेन वाणी पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक मनोज भागवत आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: The real careers are 'A good citizen': Ad. vaita Patil