‘रिअल इस्टेट’ला चालना

Home
Home

नाशिक - विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. १८) अनेकांनी फ्लॅटची बुकिंग केली. यामुळे रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळाली. रेडीपझेशन फ्लॅटला अधिक मागणी होती. त्यामुळे जुन्या प्रकल्पांवर अधिक बुकिंग झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शहरात अंदाजे पाचशेहून अधिक फ्लॅटचे बुकिंग झाले.

चार वर्षांपासून विविध कारणांमुळे हेलकावे खाणारा बांधकाम व्यवसाय विजयादशमीच्या मुहूर्तावर सावरल्याचे दिसला. शहरात तयार फ्लॅटची संख्या मोठी असून, तत्काळ ताबा देण्याची योजना ग्राहकांसमोर सादर केल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीपर्यंत बुकिंग कायम राहणार आहे.

गणेशोत्सवापासून फ्लॅटला मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी दिवाळीपर्यंत कायम राहील. तयार फ्लॅटबरोबरच सहा व साडेसात मीटरच्या रस्त्यांवरील भूखंडांना मागणी वाढली असून, अनेक भागांत भूमिपूजन झाले. शहराचा विस्तार वाढत असताना घरांबरोबरच गाळ्यांनाही मागणी वाढली आहे. बांधकाम प्रकल्पांवर गाळ्यांचे बुकिंग तत्काळ होत आहे. दिवसभरात अनेक प्रकल्पांवर गाळ्यांसाठी विचारणा झाली.

मागणीत दुप्पट वाढ
दोन वर्षांच्या तुलनेत घरांच्या मागणीत दुप्पट वाढ झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून ठराविक रक्कम ग्राहकांना मिळत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून आला. आता मार्केट स्थिर होत असल्याने घराचे भाडे भरण्यापेक्षा त्यातून गृहकर्जाचा हप्ता भरला जात असल्याची भावना बळावल्याने त्याचा परिणाम फेस्टिव्हल सिझनध्ये दिसून आल्याचे ‘क्रेडाई’चे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी सांगितले.

४२ वाहनांची नोंदणी
वाहन नोंदणीसाठी आरटीओ विभागाने कार्यालये सुरू ठेवली होती. सायंकाळपर्यंत ४२ वाहनांची नोंदणी झाली, तर विजयादशमीच्या पूर्वसंध्येला म्हणजे बुधवारी २८७ नवीन वाहनांची नोंदणी झाली. दोन दिवसांत सव्वा कोटी रुपयांचा कर आरटीओ विभागाकडे जमा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com