'या' मुळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ट्रॅक बदलाएत..

eng.jpg
eng.jpg

नाशिक : इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेले विद्यार्थीही आता खाजगी क्षेत्रात नोकरी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय व प्रशासकीय सेवेकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांत यांचा टक्का वाढत असल्याचे चित्र आहे. खाजगी क्षेत्रातील असुरक्षितता, कमी वेतनात जास्त काम, आवाक्यापालिकडील आव्हाने, वाढती स्पर्धा, अतिरिक्त द्यावा लागणारा वेळ यामुळे हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपला ट्रॅक बदलवत आहेत.

अपेक्षित वेतनाचा जॉब मिळेना...
सध्याच्या काळात कोणते शिक्षण घ्यावे अन नोकरी काय करावी याबाबत संदिग्धतच आहे. वाढत्या स्पर्धेमुळे नोकरी मिळवणे आणखी अवघड झाले आहे. पूर्वी डीएड, बीएड, एमए, एमएस्सी करून सहज नोकरी मिळत असे. नंतरच्या काळात याला ओहोटी लागून विद्यार्थी इंजिनिअरिंग कडे वळले. सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्पुटर, आयटी, इ अँड टीसी तसेच तंत्रज्ञान असे विविध फॅकल्टीच्या पदव्या मिळवण्याकडे कल वाढला. खाजगी क्षेत्रात चांगले पॅकेजेस मिळू लागले. परंतु येथेही आता इंजिनिअरिंग झालेल्यांची संख्या वाढल्याने स्पर्धा वाढली व त्यामुळे अपेक्षित वेतनाचा जॉब मिळवण्यात मर्यादा पडू लागल्या आहेत. यावर पर्याय म्हणून हे इंजिनिअरिंग चे विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग तसेच इतरही निवड स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागले आहेत. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्यांत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. जादा अभ्यास करण्याची सवय, बुद्धिमापन कसोट्य- गणित-इंग्रजीवर प्रभुत्व यामुळे ते अशा स्पर्धा परीक्षांचे आव्हान पार करतात.
 

नको ते खाजगी क्षेत्र; सरकारी नोकरी केंव्हाही सुरक्षित..
आर्थिक मंदीमुळे सर्व प्रकारची कारखानदारी बॅकफुटवर आली आहे. उत्पादन विक्री संथ आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांची कपात करावी लागत असल्याने नको ते खाजगी क्षेत्र आणि सरकारी नोकरी केंव्हाही सुरक्षित असे म्हणत हे हुशार विद्यार्थी  सरकारी नोकरीसाठी व समाजाच्या सेवेसाठी या स्पर्धा परीक्षेत उतरत यशस्वी होत आहेत. गेल्या वर्षभरात मटाणे (ता.देवळा) येथील जयेश आहेर, बेज (ता.कळवण) येथील नवजीवन पवार, मेशी- वायगावचे निकेतन कदम, तिसगावचे सुदर्शन जाधव, मालेगावचे भूषण पठाडे, आघारचे स्वप्नील खरे अशा अनेक जणांनी हे सिद्ध केले आहे.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अभियांत्रिकेचे विद्यार्थी अधिक
"सामान्यतः हुशार मुले इंजिनिअरिंग वा मेडिकल क्षेत्र निवडत असतात. इंजिनिअरिंग करून ज्यांना चांगला जॉब व पॅकेज मिळाले ते सेट होतात. परंतु काहींचे मन यात रमत नाही तर काहींना अपेक्षित जॉब मिळत नाही. मग बरेच जण स्पर्धा परीक्षांकडे वळत व यात यश मिळवत करिअर करतात. सध्या मसुरी (उत्तराखंड) येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत रँकिंग मध्ये आलेल्यांचे प्रशासकीय सेवेसाठी प्रशिक्षण चालू आहे. यात ६० ते ७० टक्के हे अभियांत्रिकेचे विद्यार्थी आहेत." - जयेश आहेर, यूपीएससी उत्तीर्ण, मटाणे (ता. देवळा)  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com