मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडलेल्या जॅकीने मानले पोलिसांचे आभार!

भगवान जगदाळे
बुधवार, 4 जुलै 2018

एका बाजूला अंत्यविधीची तयारी, पण देव तारी त्याला कोण मारी!

एका बाजूला अंत्यविधीची तयारी, पण देव तारी त्याला कोण मारी!

निजामपूर-जैताणे (धुळे) : 'देवतारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे गेल्या १ जूनला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बस व कारच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जॅकीचा पुनर्जन्म झाला याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. नातेवाईकांनी तर जॅकीची अवस्था पाहून चक्क त्याच्या अंत्यविधीचीही सर्व तयारी करून ठेवली होती. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर जॅकी मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडला. प्रकृती बरी झाल्यानंतर कृतज्ञतेने भारावलेल्या जॅकीने काल (ता.3) रात्री चक्क निजामपूर पोलिस स्टेशनला पत्नी माधुरीसह भेट देत ऋण व्यक्त केले. एखादया चित्रपटाच्या कथेत शोभावा असा हा हृदयद्रावक व भावुक प्रसंग. ही हृदयद्रावक कथा आहे खापर (ता.अक्कलकुवा) येथील रहिवासी व व्यापारी जॅकी उर्फ जयकिशन शर्मा (वय-३१) यांची.!

१ जूनला रात्री ते खापरहून नाशिक येथील त्यांच्या सासुरवाडीस पत्नीला घेण्यासाठी स्वतःच्या खाजगी कारने निघाले होते. परंतु, रात्री साडेआठच्या सुमारास निजामपूर-जैताणे पासून दोन किलोमीटर अंतरावरील व नंदुरबार-साक्री रस्त्यावरील लंगडी भवानी देवस्थानाजवळ कार व बसच्या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, अक्षरशः त्यांच्या कवटीतून मेंदू बाहेर आला होता. सदर अपघाताची माहिती मिळताच निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर पोलिस कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी ताबडतोब त्यांना प्रथमोपचारासाठी जैताणे आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेची सोय करून त्वरित नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनीही पेशंट वाचण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता वर्तविली. तिकडे नातेवाईकांनीही त्यांच्या अंतिम संस्काराची पूर्ण तयारी करून ठेवली होती. पण दैव बलवत्तर होते म्हणून ते वाचले. त्यांनतर काही दिवस त्यांनी खाजगी दवाखान्यातही उपचार घेतले.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुनर्जन्म झाल्याची भावना त्यांनी निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह 'सकाळ'कडे व्यक्त केली. पोलिस स्टेशनतर्फे सहाय्यक निरीक्षक खेडकर यांनी त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, हवालदार कांतीलाल अहिरे, जयराज शिंदे, वामन चौधरी, निलेश पोतदार, मनीष सोनगीरे, अवधूत होंडे आदींनी जॅकीला वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Web Title: rebirth due to police alertness after accident