वसुलीचा तगादा थांबवा, अन्यथा आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मालेगाव - दुबार पेरणी करूनही डोळ्यादेखत ज्वारी, भुईमुगाचं पीक जळालं. प्यायला पाणी नाही. चारा नसल्याने जनावरं कशी पोसायची?, कुठं कामधंदापण मिळत नाही. दुष्काळामुळे पोरासोरांची लग्नं थांबली. पीकविमा काढूनही पैसे मिळत नाहीत. सरकारनं दीड लाख कर्ज माफ केलं, पण माझ्यावर सहा लाखांचं कर्ज आहे. उर्वरित साडेचार लाख कुठून भरू? बॅंकवाले आणि लाइटबिलवाले त्रास देतात. त्यांचा त्रास थांबला नाही, तर आत्महत्या करू, असा इशारा मेहुणे (ता. मालेगाव) येथील शेतकरी शिवाजी मुरलीधर देवरे (वय ६३) यांनी दुष्काळाच्या पाहणीसाठी गुरुवारी (ता. ६) आलेल्या केंद्रीय पथकाला दिला.

मालेगाव - दुबार पेरणी करूनही डोळ्यादेखत ज्वारी, भुईमुगाचं पीक जळालं. प्यायला पाणी नाही. चारा नसल्याने जनावरं कशी पोसायची?, कुठं कामधंदापण मिळत नाही. दुष्काळामुळे पोरासोरांची लग्नं थांबली. पीकविमा काढूनही पैसे मिळत नाहीत. सरकारनं दीड लाख कर्ज माफ केलं, पण माझ्यावर सहा लाखांचं कर्ज आहे. उर्वरित साडेचार लाख कुठून भरू? बॅंकवाले आणि लाइटबिलवाले त्रास देतात. त्यांचा त्रास थांबला नाही, तर आत्महत्या करू, असा इशारा मेहुणे (ता. मालेगाव) येथील शेतकरी शिवाजी मुरलीधर देवरे (वय ६३) यांनी दुष्काळाच्या पाहणीसाठी गुरुवारी (ता. ६) आलेल्या केंद्रीय पथकाला दिला.

या पथकातील छावी झा, आर. डी. देशपांडे, ए. के. तिवारी, डॉ. शालिनी सक्‍सेना यांनी शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला. दुपारी सव्वातीनला या पथकाचे मेहुणे येथे आगमन झाले. शोभाबाई देवरे यांच्या शेतातील ज्वारी व भुईमूग पिकाची त्यांनी पाहणी केली. दुबार पेरणी करूनही पाण्याअभावी पीक न आल्याने ज्वारीचा कडबा व शेंगा न आलेले भुईमूग पीक शेतकऱ्यांनी पथकाला दाखविले. शिवाजी देवरे, निवृत्ती देवरे, साहेबराव देवरे, अनिल देवरे आदींनी दुष्काळाची व्यथा मांडली. दुबार पेरणीत बियाणे व खतांचे एकरी वीस हजारांचे नुकसान झाले. पिण्यासाठी टॅंकरची वाट पाहावी लागते. आता जगावे कसे? बॅंका व महावितरण कंपनी तगदा लावते. दोन वर्षे पीकविमा काढला, दमडीही मिळाली नाही. तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

या पथकाने मेहुणे येथील सार्वजनिक हौदाला भेट दिली. त्या वेळी टॅंकरने हौदात टाकलेले पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होती. टॅंकरने मिळणारे पाणी अपुरे असल्याचे गोरख वाघ, विश्‍वास देवरे आदींनी सांगितले. वऱ्हाणे येथील बाबूराव पवार व बाजीराव पवार यांच्या डाळिंबबागेचीही पथकाने पाहणी केली. बाग पूर्णपणे जळाली आहे. गेल्या वर्षी पीकविम्याचे साठ हजार मिळाले. या वर्षी अजून पैसेही मिळाले नाहीत. चार वर्षांपासून पीक तोट्यात आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

जळगाव (निं.) येथील भिका भालनोर यांच्या बाजरीची पाहणी केली. तेथे पाण्याअभावी बाजरीला कणसेच आलेली नाहीत. हाताला काम द्या. रेशनचे धान्य द्या. सरसकट कर्जमाफी करा. चाळीस वर्षांत असा दुष्काळ पाहिला नाही. तुम्ही आल्याने आमची आशा वाढली. आमची परिस्थिती मराठवाड्यासारखी झाली आहे. आम्ही आत्महत्येच्या दारात उभे आहोत.

तुम्ही काहीतरी चांगले करा, नाहीतर महिन्या-दीड महिन्यात आमचा निरोप तुम्हाला मिळेल, अशी भावना सखाहरी दुकळे यांनी व्यक्त केली. पथकाने सुभाष पोमनार व ज्ञानेश्‍वर दुकळे यांच्या रिकाम्या शेततळ्यांची पाहणी केली. दौऱ्यात विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

बाटली लेंगे और पी लेंगे!
वऱ्हाणे शिवारातील बाजीराव पवार यांनी डाळिंबावर चार वर्षांत केलेला खर्च व झालेले कर्ज याची माहिती दिली. स्टेट बॅंकेचे साडेतीन लाख रुपये कर्ज आहे. ते कसे फेडणार, असा प्रश्‍न पथकप्रमुख छावी झा यांनी पवार यांना विचारताच ते क्षणार्धात म्हणाले, ‘‘कुछ नहीं मॅडम, बाटली लेंगे और पी लेंगे.’’ हे वाक्‍य ऐकून झा यांच्यासह उपस्थित अधिकारी सुन्न झाले.

पाण्याची बाटली २० ला, तर दूध १८ रुपये लिटर 
पाण्याची तीव्र टंचाई, दुष्काळ याचबरोबर शेतकऱ्यांनी कांदा, मका व दुधाला भाव नसल्याची खंत व्यक्त केली. ‘मॅडम, एक लिटर पाण्याची बाटली २० रुपयाला मिळते. आमच्या शेतकऱ्यांचे दूध १८ ते १९ रुपये लिटरने जाते. कांद्याला भाव नाही. त्यामुळे आम्ही पिकवावे तरी काय? आणि खावे तरी काय’, असा प्रतिप्रश्‍न शेतकऱ्यांनी पथकाला केला.

दुष्काळी दौऱ्यात शेतकऱ्यांच्या व्यथा 
 पीकविम्याची दमडीही नाही
 मेहुणे गावात पीकविम्याचा एकही लाभार्थी नाही
 सातबारा कोरा करा
 शिवारात कपभरही पाणी नाही
 टॅंकरची संख्या वाढवा
 पशुधनाच्या पाण्याची सोय करा
 बियाणे नको, जनावरांसाठी चारा द्या
 कांद्याला हमीभाव द्या
 रिकाम्या हातांना काम द्या, मजुरांना रोज पगार द्या
 बॅंक व वीज कंपनीची दादागिरी बंद करा
 सर्वांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवा
 लग्न ठरले तरी जेवणाची पंगत कोठून देणार?
 मराठवाड्यासारखी परिस्थिती आमच्यावर आणू नका

Web Title: Recovery Drought Farmer Suicide