मेहुणबारे परिसरात पाच महिन्यांत 7 लाख 41 हजाराचा दंड वसूल 

मेहुणबारे परिसरात पाच महिन्यांत 7 लाख 41 हजाराचा दंड वसूल 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - जळगाव जिल्ह्यात वाळू लिलावाला "ब्रेक' लागल्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू चोरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, वाळू चोरीसंदर्भात वेळोवेळी कारवाया होऊनही वाळू उपसा अद्यापही थांबलेला नाही. येथील गिरणा नदीपात्रातूतन अनधिकृतरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्यांवर गेल्या पाच महिन्यात 45 कारवाया होऊन शासनाच्या तिजोरीत 7 लाख 41 हजार रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे. वाळू चोरी होऊ नये, यासाठी प्रशासनाचे पथकही करडी नजर ठेवून आहेत. मात्र, तरीही छुप्या मार्गाने वाळूचा बेसुमार उपसा सुरूच आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून वाळूचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे बांधकामासाठी लागणारी वाळू मिळत नसल्याने अनेक कामेही रखडली आहेत. गिरणा नदीपात्रातील वाळू बांधकामासाठी फायद्याची असल्याने या वाळूला बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्यांसह अनेक तरुण या व्यवसायात उतरले आहेत. ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमी कालावधीत भक्कम झाल्याने गुंडगिरी देखील वाढल्याचे दिसून येत आहे. 

कारवाया सुरूच 
वाळू माफियांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी मेहुणबारेचे मंडळ अधिकारी गणेश लोखंडे यांनी कारवायांचा धडाका सुरूच ठेवला आहे. केवळ मेहुणबारे भागात तहसीलदार कैलास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. लोखंडे यांच्यासह पथकातील संजय चव्हाण, आर. डी. नन्नवरे, व्ही. बी. शेळके, अनिल निकम, उत्तम तिरमली, राकेश शिरसाठ यांनी गेल्या पाच महिन्यात मेहुणबारेसह जवळच्या वडगाव लांबे, रहिपुरी, दसेगाव येथील गिरणापात्रात 45 कारवाया करून 7 लाख 41 हजार रुपयांचा दंड वाळू चोरांकडून वसुल केला आहे. अशा कारवाया होऊनही वाळूचा उपसा पूर्णपणे थांबलेला नाही. 

ग्रामस्तरीय समित्या नावालाच  
वाळूची चोरी रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार गावोगावी ग्रामस्तरीय वाळू दक्षता समित्या स्थापन केलेल्या आहेत. या समित्यांमध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये वाळू चोरी होईल, त्या गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव पाठवावा असे देखील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकात नमुद केले आहेत. या आदेशामुळे आता सरपंचांना देखील जागृत राहावे लागणार आहे. असे असले तरी मूळात ग्रामस्तरीय समित्या नावालाच असल्याने एकाही गावातून अद्यापपर्यंत वाळू चोरीसंदर्भात समितीने दखल घेतल्याचे दिसून येत नाही. 

कायदा, सुव्यवस्था धोक्‍यात  
वाळू चोरीच्या व्यवसायात तरुण पिढी दारुच्या आहारी जात असून अनेकांचे संसारही उद्‌ध्वस्त होत आहेत. कमी वेळेत जास्त पैसा मिळत असल्याने या व्यवसायात मुलांना उतरविण्यात त्यांचे पालक देखील तितकेच जबाबदार आहेत. हिंगोणे (ता. चाळीसगाव) येथील वाळू चोरीचा विषय सध्या राज्यात चर्चिला जात आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून गुंडाचे टोळके देखील तयार होत असल्याने गावागावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाली आहे. 

24 बैलगाड्या कायमस्वरूपी जप्त  
मेहुणबारे भागात मंडळाधिकारी गणेश लोखंडे यांच्या पथकाच्या निदर्शनास असे आले, की काही जण खास टायरच्या गाड्यांद्वारे वाळू वाहतूक करून ट्रॅक्‍टर भरतात. त्यामुळे तहसीलदार कैलास देवरे यांनी टायरच्या 24 बैलगाड्या कायमस्वरूपी जप्त केल्या आहेत. दरम्यान, 45 बैलगाड्या, 4 ट्रॅक्‍टर व दोन ओमनी गाड्यांच्या विरोधात पाच महिन्यात कारवाया करण्यात आल्याचे श्री. लोखंडे यांनी सांगितले. 

महसूल विभागाचे कर्मचारी कारवाया करीत असून गावागावांत ग्रामस्थांच्या मदतीशिवाय कारवाया करणे प्रशासनाला शक्‍य नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावे. कुठेही वाळू चोरी होत असेल तर तातडीने कळवावे. 
- गणेश लोखंडे, मंडळाधिकारी, मेहुणबारे भाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com