
Ramzan 2023 : ‘रमजान’मध्ये नियमित पाणीपुरवठा
धुळे : पवित्र रमजान महिन्यात पाण्याची समस्या उद्भवून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील अल्पसंख्याक प्रभागात नियमित पाणीपुरवठा होईल यादृष्टीने नियोजनाच्या सूचना स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या.
सदस्यांच्या तक्रारीनंतर सभापती श्रीमती कुलेवार व सदस्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन केलेले हे नियोजन निश्चितपणे सकारात्मक पाऊल आहे. यानिमित्ताने महापालिकेतील चालढकल कारभारालाही शिस्त लागेल, अशी अपेक्षा आहे.महापालिका स्थायी समिती सभापती श्रीमती कुलेवार यांनी शुक्रवारी (ता. १०) महापालिकेतील आपल्या दालनात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली.
स्थायी समिती सदस्य कल्याणी अंपळकर, सुनील बैसाणे, वसीम बारी, दगडू बागूल, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, एन. के. बागूल, हेमंत पावटे, कमलेश सोनवणे, प्रकाश सोनवणे तसेच डॉ. सर्फराज अन्सारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
गुरुवारी (ता. ९) स्थायी समितीची साप्ताहिक सभा झाली. सभेत विविध विषयांवर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सभापती श्रीमती कुलेवार यांच्यासह सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, याच सभेत अल्पसंख्याक भागातील काही सदस्यांनी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अल्पसंख्याक भागात नियमित, सुरळीत व वेळेवर पाणीपुरवठा करावा, स्वच्छता राखावी, अशी मागणी केली. ही मागणी करताना सद्यःस्थितीत आठ-आठ, दहा-दहा दिवसांतून पाणीपुरवठा होत असल्याच्या व नागरिक नगरसेवकांच्या घरावर मोर्चा आणतात अशा तक्रारीही झाल्या.
त्यामुळे किमान पवित्र रमजान महिन्यात अशी परिस्थिती येऊ नये व त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, अशी मागणी झाली. सदस्यांच्या या तक्रारींची दखल घेत सभापती श्रीमती कुलेवार यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
नियोजनानुसार पाणी देऊ
सदस्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने बैठकीत पवित्र रमजान महिन्यात अल्पसंख्याक प्रभागांमध्ये नियमित तसेच सकाळी व दुपारी चारच्या आत तसेच पाच-सहा दिवसांत नागरिकांना पाणी मिळेल यादृष्टीने नियोजन करण्याच्या व त्यानुसार अंमलबजावणीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे सभापती श्रीमती कुलेवार यांनी सांगितले.
स्थायी समिती ‘ॲक्टिव्ह’
स्थायी समिती नव्याने गठित झाल्यानंतर गेल्या दोन-तीन साप्ताहिक सभांमध्ये सभापती श्रीमती कुलेवार यांच्यासह सदस्य ॲक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. विविध विषयांवर प्रशासनाला जाब विचारून ते विषय मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
आमच्या हातात केवळ आठ महिनेच आहेत, निवडणुकीसाठी नागरिकांपुढे पुन्हा जायचे आहे, असे म्हणत पोटतिडकीने प्रश्न मांडले जात आहेत. प्रशासनाच्या चालढकल कारभारालाही लगाम लावण्याचा समितीचा प्रयत्न दिसतो. निवडणुकांचे निमित्त का असेना प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू असलेला हा प्रयत्न स्वागतार्ह आहे.