रुळणाऱ्या शब्दांनी मराठी भ्रष्ट नव्हे, समृद्ध होईल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करण्याचा खटाटोप केला जाऊ नये. एखादा शब्द समजला नाही, तर तो कोणत्या संदर्भासह येतो हे जाणून घ्यायला हवे.

आज 'जनस्थान' पुरस्कार प्रदान 

नाशिक : भाषा नेहमी खुली अन्‌ सर्वसमावेशक हवी. भाषेमध्ये बोलीसह ग्रामीण आणि इंग्रजीमधील शब्द यायला हवेत. पण, हे सगळे माफक प्रमाणात घडावे, असे सांगतानाच; कणखर-रुळणाऱ्या शब्दांनी मराठी भाषा भ्रष्ट नव्हे, तर समृद्ध होईल, अशी आग्रही भूमिका समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी मांडली.

मराठी भाषेतील मानाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान पुरस्कार' आज डॉ. राजाध्यक्ष यांना प्रतिष्ठाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. त्यासाठी डॉ. राजाध्यक्ष यांचे नाशिकमध्ये आगमन झाल्यावर मराठी राजभाषा दिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्या बोलत होत्या. 

इंग्रजी शुद्ध आणि प्रमाण भाषा नसल्याचे सांगून, डॉ. राजाध्यक्ष म्हणाल्या, ''इंग्रजी भाषेत इतर वेगवेगळ्या भाषांप्रमाणेच मराठी भाषेतील शब्दांचाही समावेश आहे. खरे म्हणजे, मराठी भाषेचे निरनिराळे उलगडत जाणारे रंग आपण समजावून घ्यायला हवेत. 'आठवणीतील पक्षी', 'गोतावळा'मध्ये बोलीभाषेतील शब्दांचा वापर करणारे शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर अशांचे साहित्य वाचायला हवे.

मुळातच, मराठीत सोप्या शद्बांचा वापर वाढवायला हवा. एकोणिसाव्या शतकातील विचारवंतांना वापरलेले शब्द लोकांपर्यंत पोचले आहेत. म्हणूनच मराठी क्‍लिष्ट असू नये. सरळ, साधे, पारदर्शक लिहायला हवे. इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करण्याचा खटाटोप केला जाऊ नये. एखादा शब्द समजला नाही, तर तो कोणत्या संदर्भासह येतो हे जाणून घ्यायला हवे.'' 

अभिजात दर्जा आपोआप मिळेल 
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावा लागणार नाही. आजची स्थिती लगेच उद्या पालटेल असे होणार नाही. मात्र, उतावळेपणा करून चालणार नाही. काही काळ जावा लागेल. त्यातून आपोआप मराठीला अभिजात दर्जा मिळेल, असे परखडपणे सांगत; मराठीला प्रतिष्ठेचे स्थान मिळावे, पुरेशा प्रेमासह आदर वाढवावा लागेल, असे, डॉ. राजाध्यक्ष यांनी अधोरेखित केले. अभिजात दर्जासाठी करण्यात आलेल्या तरतुदीचा सदुपयोग करत सुबद्धपणाने वाटा शोधल्यास नक्कीच फरक पडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त करताना त्यांनी कुसुमाग्रजांच्या 'माझ्या मराठी भाषेचा कपाळी लावा टिळा', या आग्रहाचा दाखला दिला. 

Web Title: regularly used words make marathi rich