‘कुंभथॉन’अन्‌ संशोधकांची फळी

sucess-story nashik
sucess-story nashik

कुंभथॉन ही नाशिकच्या तरुणांची संशोधन (इनोव्हेशन) संबंधित चळवळ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाली. जानेवारी २०१४ च्या सुमारास अमेरिकास्थित व मूळचे नाशिकचे असलेले एमआयटी मीडिया लॅबचे असोसिएट प्रोफेसर डॉ. रमेश रासकर यांच्यासह नाशिकच्या काही तज्ज्ञांमध्ये एका भेटीदरम्यान चर्चा झाली. यानंतर झालेल्या विविध कार्यशाळांतून युवा संशोधकांनी कुंभमेळा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुखकर केला. कुंभमेळ्यात राबविलेले विविध प्रयोग यशस्वी ठरले. यानिमित्त सुरू झालेले संशोधनाचे यज्ञ पुढेही सुरू राहिले आहेत. कुंभथॉनद्वारे संशोधकांची फळी निर्माण करीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. 

बदल होऊ शकतो...

मंत्रभूमी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यात गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून उपाय शोधायचा, असे एकमत कुंभथॉन टीमच्या बैठकीत झाले. स्थानिक प्रशासनाला भेडसावणारे प्रश्‍न जसे गर्दीचे नियंत्रण, आरोग्याशी संबंधित रुग्णांना आपत्कालीन मदत, साथीच्या रोगप्रसाराला प्रतिबंध, निवास व अन्नवितरणाचे नियोजन, विकिपीडियावर नाशिकच्या माहितीची सुधारित आवृत्ती तयार करणे आदी विषयांवर काम करावे या विचाराने सर्वांनाच झपाटले. देशभरातील भाविकांचा सहभाग असणाऱ्या कुंभमेळ्यात युवकांना संशोधनाची संधी म्हणून पाहावे व या इनोव्हेशनच्या यज्ञात सहभागी व्हावे, यासाठी कुंभथॉन टीमने अनेकांना सोबत घेत विविध महाविद्यालयांतील तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जाऊन तेथील तरुणांना प्रेरित केले. आलेल्या हजारो अर्जांची छाननी करून नाशिकसह देशभरातील अडीचशेहून अधिक तरुण संशोधकांची मोठी फळी उभारली. यावर दर तीन महिन्यांनी संशोधनाच्या कार्यशाळा भरविल्या. यामध्ये स्थानिक संस्थांबरोबरच जगभरातील अनेक मोठमोठ्या संस्थाही सहभागी झाल्या. एमआयटी, मायक्रोसॉफ्ट, गुगल, याहू, फेसबुक, इंटेल, टीसीएस, कोलगेट, जाबील, बिल गेट्‌स फाउंडेशन यांचा कार्यशाळेत सक्रिय सहभाग राहिला. या कार्यशाळांत अनेक समस्यांपैकी २५ समस्या निवडून त्यावर काम केले गेले. त्यातील १३ समस्यांवर उपाय शोधून २०१५ च्या कुंभमेळ्यात ते यशस्वीपणे राबविले. 

मेडीट्रेकर, नाशिक कुंभ अशा विविध ॲप्सच्या सहाय्याने येणाऱ्या भाविकांना स्मार्टफोनद्वारे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले गेले, तर येणाऱ्या भाविकांची संख्या मोजण्यासाठी विशेष पद्धतीच्या मॅटचा वापर करण्यात आला. मोबाईल टॉवरच्या माध्यमातून कुठल्या परिसरात अधिक गर्दी आहे, याचाही शोध घेण्यात आला. यापूर्वी विकिपीडियावर नाशिकचीही तुरळक माहिती उपलब्ध होती. परंतु विशेष मोहीम राबवत नाशिककरांकडून छायाचित्रे संकलित करत विकिपीडियावर नाशिकचे भले मोठे पेज तयार करण्यात आले. सर्वांत मोठ्या पेजपैकी हे एक ठरले, हेही टीमचे मोठे यश होते. प्रशासनाचे प्रयत्न व त्यास टीम कुंभथॉनच्या संशोधनांच्या मदतीमुळे कुंभमेळा निर्विघ्न तर पार पडला, सोबत सहभागी झालेल्या काही संशोधकांना यामुळे आपल्या स्टार्ट अप सुरू करण्याचेही प्रोत्साहन मिळाले.

बोस्टनमध्ये सादरीकरण अन्‌ टीसीएसतर्फे इनोव्हेशन सेंटर
कुंभमेळ्यातील या विविध प्रयोगांच्या सादरीकरणाची माहिती देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व टीम कुंभथॉनच्या सदस्यांना बोस्टन  (अमेरिका) येथे आयोजित परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले. तेथे त्यांनी या चळवळीबाबत माहिती देणारे सादरीकरण करत जगभराचे लक्ष वेधले. कुंभथॉनने सुरू केलेल्या या चळवळीपासून प्रेरित होऊन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च संस्था टीसीएस फाउंडेशनने नाशिकमध्ये डिजिटल इम्पॅक्‍ट स्क्‍वेअर हे भव्य इनोव्हेशन सेंटर उभारले. हे टीसीएसचे जगातील एकमेव असे इनोव्हेशन सेंटर असून, यात शंभरहून अधिक संशोधक नाशिकच्या नागरिकांशी संबंधित प्रश्‍नांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक प्रशासनास सहकार्य करीत आहेत.

शहरातील वाहतूक व्यवस्था मोडकळीस आल्याने आयटी उद्योग शहराबाहेर चालले आहेत. ‘मगरपट्टा मॉडेल’प्रमाणे कार्यालय आणि निवासी इमारती एकाच ठिकाणी असलेले प्रकल्प यापुढे निर्माण करण्याची गरज आहे. ‘ऑटोमेशन’मुळे आता नोकऱ्याही कमी होत आहेत, त्यामुळे अशा कंपन्यांनी स्थानिक पातळीवरील स्टार्ट अप्स विकत घेऊन (हब अँड स्पोक मॉडेल) विस्तार केला पाहिजे.
- दीपक शिकारपूर, आयटी तज्ज्ञ 

पुढील काळात आयटी क्षेत्राचा शहर केंद्रित विकास होणार नाही, त्यामुळे बड्या आयटी कंपन्यांनीही ‘ऑफशोरिंग’ मॉडेल सोडून स्टार्ट अप आणि स्थानिक उद्योगांना पूरक असे विकेंद्रित मॉडेल राबविल्यास त्यांना यश येईल. शहर सोडून लगतच्या छोट्या गावांमध्ये जाणे आणि तेथील समस्या सोडविणे हेच आयटी क्षेत्राच्या विकासासाठी भविष्यातील सूत्र आहे.
- गीरेंद्र कसमाळकर, संस्थापक, ‘आयडियाज टू इम्पॅक्‍ट’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com