युती खड्ड्यात घाला, लोकांचे प्रश्न सोडवा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

नाशिक - महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र भाजप-शिवसेनेला त्याचे काही देणे-घेणे नाही, ते एकमेकांची उणीधुणी काढण्यात मशगुल आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. युती खड्ड्यात घाला पण लोकांचे प्रश्‍न सोडवा, असा इशारा देत भाजपने एकाही मुस्लिम नेत्याला मंत्रिपद दिले नसल्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

नाशिक - महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र भाजप-शिवसेनेला त्याचे काही देणे-घेणे नाही, ते एकमेकांची उणीधुणी काढण्यात मशगुल आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. युती खड्ड्यात घाला पण लोकांचे प्रश्‍न सोडवा, असा इशारा देत भाजपने एकाही मुस्लिम नेत्याला मंत्रिपद दिले नसल्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या पवननगर स्टेडियममध्ये झालेल्या सभेत श्री. पवार बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, जयवंत जाधव, आमदार जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले, नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते. काँग्रेससमवेतच्या आघाडीमध्ये मित्रपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून, त्यात बऱ्याचअंशी यश येत आहे. बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करताना कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाईल, असे सांगून श्री. पवार यांनी नाशिकचा विकास खुंटल्याचा आरोप केला. छगन भुजबळ हे पालकमंत्री असताना विकास झाला. तसा विकास आता झाला का? आताच्या पालकमंत्र्यांनी काही दिले का? हा खरा प्रश्‍न आहे.

आता देश नका विकू 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत श्री. भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. तुम्ही चहा विकत होता, असे सांगत मीपण नाशिकच्या रस्त्यावर भाजी, फुलांच्या माळा विकल्या असल्याचे सांगायचे? असा प्रश्‍न उपस्थित करत आता देश विकू नका, अशा शब्दांत भाजपला ठणकावले. मराठा, ओबीसी, दलित, हिंदू, मुस्लिम यांच्यात भांडण लावण्याचे कटकारस्थान आखले जात असल्याने सगळ्यांनी जागे राहायला हवे. देशात मनुवाद उफाळतो आहे. राज्यघटना ही आमची गीता, बायबल, कुराण आहे. ते बदलायला राजकर्ते निघाले आहेत. त्यांना वेळीच रोखावे लागेल.

नाशिक ‘क्राइम सिटी’
नाशिक ‘क्राइम सिटी’ झाल्याचा आरोप करत माजी खासदार भुजबळ यांनी नाशिकमधून पळवलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचला. श्रीमती खान यांनी विरोधी पक्षांना संपविण्याचे चालेला उद्योग, बोकाळलेला भ्रष्टाचार, गमवाव्या लागलेल्या नोकऱ्या यावर बोट ठेवले. डॉ. हिरे यांनी नाशिकचा सुरू असलेला विकास बंद पाडण्यात आल्याची तक्रार केली. सिडकोत सुविधा न देता तिप्पट केलेली घरपट्टी ही समस्या मांडत सिडकोवासीयांच्या नावावर घर करत बांधकाम अधिकृत करणे आणि रोजगारासाठी उद्योग आणावे, असे सांगितले. श्री. ठाकरे, श्री. आव्हाड, नगरसेवक गजानन शेलार, श्री. महाले यांचीही भाषणे झाली. शिवसेनेचे माजी नगरसेवक शैलेश ढगे यांच्यासह भाजपच्या डॉ. योगिता हिरे, डॉ. ज्योती सोनवणे, डॉ. सोनल मंडलेचा आदींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

भुजबळ म्हणाले...
आम्हाला अडीच वर्षे तुरुंगात ठेवण्यासाठी का पकडले हे आम्हाला आणि पकडणाऱ्यांना माहिती नाही
दिल्लीत राजवाड्यासारखे बांधणारे महाराष्ट्र सुंदर आहे, असे सत्ताधारी म्हणतात अन्‌ बांधणारा ‘अंदर’
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी बिनविरोध निवडून दिल्यावर भेट दिलेल्या एच. ए. एल. चा ‘राफेल’चा करार रद्द केल्याचे दुःख 
ओबीसींच्या विरोधात न्यायालयात पाच दावे दाखल झाले असून, सरकारी वकील गप्प बसलेत

Web Title: Resolve the questions of the people Says Ajit Pawar