अखेरच्या "कफना'लाही पोलिसच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

नाशिक - आजारपणाने वा अपघाताने मृत्यू ओढावल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन त्या मृतदेहाला कफन देण्यासाठीची जबाबदारीही पोलिसांवरच येऊन पडली आहे. सेवाभावी संस्था अन्‌ शवविच्छेदन कक्षातील विसंवादातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीतील पोलिसांवर सोपविल्याने येथील काही महाभाग पोलिसांना आयतेच "कुरण' गवसले आहे. 

नाशिक - आजारपणाने वा अपघाताने मृत्यू ओढावल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन त्या मृतदेहाला कफन देण्यासाठीची जबाबदारीही पोलिसांवरच येऊन पडली आहे. सेवाभावी संस्था अन्‌ शवविच्छेदन कक्षातील विसंवादातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीतील पोलिसांवर सोपविल्याने येथील काही महाभाग पोलिसांना आयतेच "कुरण' गवसले आहे. 

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान वा अपघातातील मृतांचे शवविच्छेदन केले जाते. त्यानंतर या मृतदेहांसाठी शहरातीलच एका सेवाभावी संस्थेकडून अखेरचे "कफन' पुरविले जाते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सेवाभावी संस्थेकडून शवविच्छेदन कक्षाकडे त्याचा पुरवठा केला जातो. मात्र सेवाभावी संस्था व शवविच्छेदन कक्ष यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून विसंवाद सुरू होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा खटकेही उडाले होते. 

दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाबाहेर झालेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे कफन पुरविण्यासंदर्भातील समस्या सेवाभावी संस्थेने मांडली. त्या वेळी त्यांनी वाद टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी कफन देईल, असा "तोंडी' आदेश दिला. त्या सेवाभावी संस्थेने लगेचच कापडाचे कपाटच चौकीमध्ये आणून ठेवले आणि तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना कफन वाटपाच्या नोंदी ठेवण्यास सांगितले. अचानक आलेल्या या अतिरिक्त कामाने पोलिसही चक्रावले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनीही दुजोरा दिल्याने कर्मचाऱ्यांचाही नाइलाज झाला. 

मात्र, या प्रकारामुळे येथील पोलिस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात श्‍वानदंशापासून ते हाणामाऱ्या, अपघातापासून ते मृतदेहांच्या पंचनाम्यांच्याही नोंदी कराव्या लागतात. त्या ही आणखी एक भर पडल्याने येथील पोलिसांच्या कामकाजात अशी जबाबदारी येते का, असा प्रश्‍न उभा राहिला. 

पैशाची मागणी 
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीमध्ये कार्यरत असलेले काही पोलिस कर्मचारी मृतदेहाच्या पंचनाम्यासाठीही त्याच्या नातलगांकडून पैसे उकळतात. याच कर्मचाऱ्यांकडून मृतदेहाला अखेरचे कफन देतानाही "पैसे' घेणार नाहीत याची कोणतीही शाश्‍वती नाही. उलट त्यांच्यासाठी "कफन' आणखी एक पैसे मागण्याचे आयते कुरण सापडले आहे. इतकेच नव्हे, तर या ठिकाणी पोलिसांच्या नावाखाली येथे तोतया पोलिस येऊन पंचनामे करतात. कफनाच्या नोंदी होण्याऐवजी नातलगांची आर्थिक पिळवणूकच होत आहे. 

सेवाभावी संस्थेच्या प्रतिनिधींनी विनंती केल्याने ती जबाबदारी पोलिस चौकीकडे देण्यात आली आहे; परंतु त्यात काही गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास ती जबाबदारी पुन्हा त्या संस्थेकडे दिली जाईल. 
-डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे 

Web Title: Responsibility of police to the dead body