पहिली ते नववीपर्यंतचे वार्षिक निकाल जाहिर

रोशन खैरनार
बुधवार, 2 मे 2018

सटाणा : शहर व तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक (इयत्ता पहिली ते नववी पर्यंत) शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचा निकाल काल (ता. 1) महाराष्ट्र दिनी विविध शाळांमध्ये जाहिर करण्यात आला. गुणपत्रक घेण्यासाठी शहर आणि तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकवर्गानेही हजेरी लावली होती.

सटाणा : शहर व तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक (इयत्ता पहिली ते नववी पर्यंत) शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचा निकाल काल (ता. 1) महाराष्ट्र दिनी विविध शाळांमध्ये जाहिर करण्यात आला. गुणपत्रक घेण्यासाठी शहर आणि तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकवर्गानेही हजेरी लावली होती.

निकालाबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले होते. प्रगती पुस्तक हातात येताच अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याने काहींचे चेहरे फुलले होते. तर कमी गुण मिळाल्याने काहींचे थोडे हिरमुसलेले दिसत होते. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह मित्रमंडळी आणि घरातील सदस्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

वार्षिक परीक्षांचा निकाल असल्यामुळे काल सकाळी सात वाजताच सर्व शाळांचा परिसर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकवर्गांनी गजबजू लागला होता. सुट्टीत मामाच्या गावी, परगावी गेलेल्या मुलांनी निकाल पाहण्यासाठी मंगळवारी सकाळी शाळेत हजेरी लावली. महाराष्ट्र दिनानिमित्त शाळांमध्ये सकाळी 8 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आपल्या पाल्यांचा निकाल घेण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने शाळेत पोहचला होता. ध्वजारोहणानंतर वर्गशिक्षकांनी प्रत्येक वर्गानुसार निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तकांचे वाटप केले. काही विद्यार्थी सुट्टीत मामाच्या गावी गेल्यामुळे त्यांचा निकाल पालकांनी घेतला. प्रगती पुस्तक हाती येताच यंदा तू पास होऊन कितवीत गेलास, कोणाला कोणती श्रेणी मिळाली, किती गुण मिळाले, वर्गात कोण पहिला आला? याची विचारपूस विद्यार्थी एकमेकांना करीत होते.

निकालाबाबत सर्वच विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. निकालानंतर त्यांच्या मनावरील एकप्रकारचा ताण कमी झाल्याचे दिसून येत होते. वर्गात सर्वाधिक तसेच चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षकांसह पालकांचीही थाप पडत होती. विद्यार्थ्यांचे अन्य विद्यार्थ्यांकडून अभिनंदनही केले जात होते. सर्व मोबाईल कंपन्यांचे फोन दिवसभर खणखणत होते. नातेवाईक व मित्रमंडळींना आपल्या पाल्याचा निकाल सांगण्यात पालक दंग होते.

Web Title: results declared of 1st to 9th