दस्तनोंदणी महसुलात ३ हजार कोटींची घट

दस्तनोंदणी महसुलात ३ हजार कोटींची घट

नाशिक - स्वप्नातील घरं साकारण्याबरोबर रोजगार निर्मितीचे प्रभावी साधन म्हणून पुढे आलेल्या बांधकाम क्षेत्रापुढे मावळत्या वर्षात विविध प्रश्‍नांची मालिका तयार झाली होती. त्याचा परिणाम आता या क्षेत्रातून जमा होणाऱ्या महसुलावर दिसू लागला असून, २०१७-१८ च्या तुलनेत आज संपलेल्या आर्थिक वर्षात नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यातील महसुलात ३ हजार कोटींहून अधिक घट झाली आहे.

राज्यात २०१७-१८ मध्ये या विभागाला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ३ हजार ४९४ कोटींनी अधिक महसूल मिळाला. या वर्षात राज्यात २२ लाख ५२ हजार ८७८ दस्तांची नोंदणी झाली आणि या विभागाकडे २६ हजार ५३४ कोटींचा महसूल जमा झाला होता. या विभागाच्या संकेतस्थळावर आज सायंकाळी साडेसातपर्यंत ‘अपडेट’ होत असलेल्या माहितीच्या आधारे वर्षभरात २३ लाख ६६ हजार ७१९ दस्तांची नोंदणी झाली. म्हणजेच, मागील वर्षाच्या तुलनेत एक लाखाहून अधिक दस्त नोंदवले गेलेत. तसेच यंदा या विभागाकडे २२ हजार ९९५ कोटींचा महसूल जमा झाला आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून (ता. १)  अंमलबजावणी होणाऱ्या बाजारमूल्यदरात वाढ होणार नाही, अशी शक्‍यता तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना वाटत होती. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर नवीन बाजारमूल्य दराची अंमलबजावणी सुरू होईल अथवा नाही, याबाबतची साशंकता वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नवीन बाजारमूल्यदरामध्ये २ ते ६ टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नवीन बाजारमूल्यदराची स्थिती काय राहील, याचे उत्तर उद्याचे दस्तऐवज नोंदणीबरोबर मुद्रांकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरू होईल त्यातून स्पष्ट होणार आहे.

‘लो-रेट हाउसिंग’ वाढले
नोटाबंदी, जीएसटी अशा फेऱ्यांमध्ये अडकलेल्या बांधकाम क्षेत्राची यंदाच्या आर्थिक वर्षात महसूल देण्यात कामगिरी कशी राहील? याबद्दलची उत्सुकता साऱ्यांना होती. याच पार्श्‍वभूमीवर गेल्यावर्षीच्या तुलनेत महसूल कमी झाला असला तरीही, दस्तांच्या संख्येत झालेल्या वाढीबद्दल बांधकाम व्यावसायिकांकडून जाणून घेण्यात आले. काही जणांनी वीस ते पंचवीस लाखांपर्यंतच्या ‘लो-रेट हाउसिंग’ वाढल्याबद्दलचा अंदाज दस्तऐवजाच्या संख्येवरून बांधला आहे. शिवाय, काही व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार जुने करार (ॲग्रीमेंट) नोंदवले जाण्यातून दस्तऐवजांची संख्या वाढू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com