पैशाच्या लालचेपोटी रिक्षावाला गेला ना बाराच्या भावात.. 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

एकीकडे प्रामाणिक रिक्षावाले तर दुसरीकडे लुटमार करणाऱ्या रिक्षाचालकांचीही शहरात काही कमतरता नाही. असाच एक वाईट अनुभव एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला आला असून, तिचा विसरून राहिलेला मोबाईल परत देण्यासाठी रिक्षाचालकाने तिच्याकडे पैशांची मागणी केली. अखेर त्याला हे चांगलेच महागात पडले असून निर्भया पथकाने त्यास अटक करून सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ​

नाशिक : रिक्षातून प्रवास करीत असताना अनेकदा प्रवाशांकडून त्यांच्या किमती वस्तू व बॅग विसरून राहून जाते. अशावेळी बऱ्याचदा रिक्षाचालक प्रामाणिकपणे नजिकच्या पोलीस ठाण्यात जाऊन त्या वस्तू जमा करून आपला प्रामाणिकपणा दाखवितात. अशा प्रामाणिक रिक्षाचालकांचा पोलिसांकडून सन्मानही केला जातो. असे अनुभव एका बाजुला असताना, दुसऱ्या बाजूला मात्र प्रवाशांची लुटमार करणाऱ्या रिक्षाचालकही काही कमी नाही. एक महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा रिक्षात विसरून राहिलेला मोबाईल परत देण्यासाठी रिक्षाचालकाने तिच्याकडे पैशांची मागणी केली खरी मात्र हे त्या रिक्षावाल्याच्या चांगलचं महागात पडले असून निर्भया पथकाने त्यास अटक केली आहे.
 

झाले असे की..

कॉलेजरोड परिसरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मुलीच्या वस्तीगृहात तक्रारदार विद्यार्थिनी राहते. सोमवारी (ता.२१) ती शहरात काही खरेदीसाठी करण्यासाठी वस्तीगृहातून गेली होती. परत येताना तिने अशोकस्तंभ येथून रिक्षानेच (एमएच 15 इएच 4383) वस्तीगृहात आली. रिक्षाचालकाला भाड्याचे पैसे दिल्यानंतर ती तिच्या खोलीत आली. परंतु त्यावेळी तिच्या लक्षात आले की तिचा सॅमसंगचा २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल रिक्षामध्येच विसरून राहिला आहे. तिने तिच्या मैत्रिणीकडे धाव घेतली आणि तिच्या मोबाईलवरून रिक्षात राहिलेल्या तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी संबंधित रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखविण्याऐवजी,आलेला फोन उचलला आणि गिरणारे गावात हजार रुपये घेऊन ये आणि मोबाईल घेऊन जा, असे म्हणाला. 
त्या विद्यार्थिनीनी थेट निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक कल्पिता सूर्यवंशी यांना फोन लावला आणि घडलेला प्रकार फोनवर सांगितला. पथकाने वस्तीगृहावर पोहोचून त्या विद्यार्थिनींला घेतले आणि तडक गिरणारे गाव गाठले. निर्भया पथकातील उपनिरीक्षक आर. एस. तडवी, हवालदार पाडवी, कासर्ले, राठोड यांच्या पथकाने संशयित रिक्षाचालक व त्याच्या जोडीदाराच्या मुसक्‍या आवळल्या आणि अटक करून त्यांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात आले. दोघांविरोधात पोलीसात नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिली समज 
तक्रारदार विद्यार्थिनीने संशयित रिक्षाचालकांविरोधात तक्रार दिली नाही. संशयित रिक्षाचालकास मोबाईल लांबविता आला असता, परंतु त्याने दोन पैशांच्या लालसेने पैसे मागितले. मात्र विद्यार्थिनींला बोलाविण्याचा हेतू अस्पष्ट असल्यानेच तिने निर्भया पथकाशी संपर्क साधला. संशयित रिक्षाचालकाची पार्श्‍वभूमी संशयास्पद नसल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने, त्यास समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र दोन पैशांची लालच त्यास चांगलीच महागात पडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw driver arrested for Greed for money