'नाशिकमधील दंगलीची सीआयडी चौकशी करावी'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

307 सारखे गंभीर कलम लावून गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, सत्यपरिस्थिती पाहता, एकाच समाजावर हे गुन्हे लावल्याचे दिसून येते. पोलिस यंत्रणा चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करीत आहे, हे यावरून स्पष्ट होते.
- आनंदराज आंबेडकर, संस्थापक अध्यक्ष, रिपब्लिकन सेना.

नाशिक - तळेगाव-अंजनेरीच्या अत्याचाराची घटना दुर्दैवी असून त्याचे समर्थन नाही. मात्र, त्यानंतर गावगुंडांनी जाणीवपूर्वक अशांतता पसरविली आहे. त्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्याची गरज असून दंगलीची सीआयडीमार्फत चौकशीची मागणी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. तसेच, गावांमधील दलित समाज अजूनही भीतीच्या सावटाखाली असून ज्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा होती, त्या पोलिस यंत्रणेकडूनच दलितांवर गंभीर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

तळेगाव-अंजनेरीतील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज जिल्हा रुग्णालयात पीडित चिमुरडी व पालकांची भेट घेतली. तसेच या दंगलीमध्ये जखमी झालेल्यांची भेट घेऊन चौकशी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, ""नामांतराच्यावेळीही अशास्वरूपाची परिस्थिती उद्‌भवली नव्हती, त्यापेक्षाही भयानक परिस्थिती दंगलीनंतर दलित समाजावर उद्‌भवली आहे. ही दंगल जाणीवपूर्वक घडवून आणली आहे. त्यास काही मंत्र्यांच्या वक्तव्याचे खतपाणी मिळाले असले तरी सध्या आरोप-प्रत्यारोपापेक्षा या दंगलीची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी ही चौकशी सीआयडीमार्फत करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. ‘‘

अन्यथा उच्च न्यायालयात जाणार
अद्यापही काही गावांमध्ये दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्यासारखी स्थिती आहे. राज्यात सामाजिक सलोखा व शांतता प्रास्थापित करणे महत्त्वाचे असले, तरी दलितांवर हल्ले करणाऱ्यांना हल्लेखोरांना अद्यापही अटक केलेली नाही. दलितांना न्याय मिळणार नसेल तर आपण उच्च न्यायालयात दाद मागू असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

Web Title: Riots in Nashik CID to probe