उन्हाळी कांदा सडतोय चाळीतच  

दीपक कच्छवा 
सोमवार, 27 मे 2019

वातावरणात उन्हाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने कांद्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी भरून ठेवलेला कांदा चाळीतच सडू लागला आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - वातावरणात उन्हाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने कांद्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी भरून ठेवलेला कांदा चाळीतच सडू लागला आहे. काही शेतकऱ्यांनी मागील वर्षाचा कांदा चांगल्या भावाच्या अपेक्षेने चाळीत भरून ठेवला होता, तो देखील सडत आहे. यंदाही अशीच परिस्थिती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहेत. अगोदरच दुष्काळी परिस्थिती व त्यात कांद्यांचे होणारे नुकसान पाहता, शासनाने कांद्यांच्या बाबतीत ठोस धोरण अवलंबवावे, अशी मागणी कांदा उत्पादकांमधून होत आहे. 

चाळीसगाव तालुक्यात मागीलवर्षी एक हजार पाचशे हेक्टरवर उन्हाळी काद्यांची लागवड झाली होती. यावर्षी ही लागवड निम्माने घटली आहे. तालुका कृषी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ८५८ हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड झाली आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्र ९५ हजार हेक्टर असून यात ऊस, मका, केळी आदी पिके घेतली जातात. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे इतर पिकांबरोबरच बागायती पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेषतः कांद्याच्या बाबतीत तर अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच बिघडले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपे, रासायनिक खते, औषधांवर हजारो रुपये खर्च केलेला आहे. पाण्याअभावी या पिकातून शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्नच मिळालेले नाही. कांदा पिकाला भरपूर पाणी लागते. यावर्षी पाण्याची टंचाई असताना अनेकांनी दिवस रात्र करून कसेबसे पिकांना पाणी दिले. मात्र, ते पुरेसे नसल्याने व वेळेवर दिल्या न गेल्याने कांद्याच्या रोपांची वाढ कमी होऊन कांद्याचा आकार लहान झाला आहे. कमी पाण्यामुळे हा फटका बसल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे. 

शासनाने हमी भाव द्यावा 
राज्य शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान दिले. प्रत्यक्षात हे अनुदान काहींना मिळाले तर काहींना मिळेलेच नाही. या संदर्भात गावपातळीवर शेतकऱ्यांना कुठलीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे ‘माय खाऊ देई ना, अन बाप भीक मागू देई ना’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कांद्याला अनुदान देण्यापेक्षा प्रतिक्विंटल एक हजार ते बाराशे रुपयांचा हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. कांद्याला सध्या ५०० ते ९०० पर्यंतचा भाव चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिला जात आहे. कांद्याच्या एखाद्याच वाहनाला ८०० ते ९०० रुपयाचा भाव दिला जातो. उर्वरित मालाला सहाशे ते सातशेचाच भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

कांद्यांचा खत म्हणून वापर 
काही शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या कांदा कमी भावामुळे विकण्याऐवजी किंवा फेकण्याऐवजी तो शेतातच टाकून जैविक खत म्हणून वापर केला आहे. बाजारात मिळणाऱ्या कवडीमोल भावापेक्षा कांद्याचे खत केलेले काय वाईट, अशी भावना शेतकरी व्यक्त करतात. सद्यःस्थितीत कांद्यांना मिळणारा भाव चांगला असला तरी सर्वच शेतकऱ्यांना सरसकट हा भाव मिळतो असे नाही. कमी भावाने कांदा विकला गेला तर उत्पादन खर्च देखील निघत नाही. आजही कांदाचाळीत भरताना निवडक कांदाच चाळीत टाकला जातो. अधिक तापमानामुळे कांदे सडत असून सडलेली कांदे शेतात 
पसरवून त्यांचा खत म्हणून वापर केला जात आहे. 

वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम 
गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. अशा वातावरणात कांदाचाळीतील कांदा सडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी कांदाचाळीत न ठेवता, बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. मागीलवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडला होता. वाढत्या तापमानाच्या दुष्परिणामामुळे जो भाव मिळेल त्या भावात विकून शेतकरी मोकळे होत आहेत. 

शेतकरी म्हणतात....  
झालेला खर्चही निघणार नाही 
सरदारसिंग राजपूत (जामदा) -
 आम्ही सर्व भाऊ मिळून एकूण अकरा एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती. दोन हजार क्विंटलच्यापुढे कांद्यांचे उत्पादन झाले. या काद्यावर जवळपास चार लाख रुपयांचा खर्च झाला आहे. मजुरीवर झालेला खर्च आणि आता बाजारात पाहिजे तसा भाव नसल्याने हा खर्च देखील निघणार नाही असे दिसते. 

उत्पादन खर्चही निघाला नाही 
प्रशांत पवार (धामणगाव) - कांदा लागवडीसाठी मशागत, रोपे खरेदी, शणखत, पाणी, मजुरी वाहतूक, गोण्या, आडत, हमाली असा मोठा खर्च आमचा झाला होता. शिवाय सलग सहा महिने शेतात राबवून काद्यांची काळजी घेऊन उत्पादन घेतले. एक महिन्यापूर्वी कांदा विकल्यानंतर जी काही रक्कम हाती आली, ती पाहता उत्पादन खर्च देखील निघाला नाही. 

शासनाने ठोस पावले उचलावीत 
मनीष निंकुभ (वडगाव लांबे) - बाजारात जाऊन कांदा विकणे, गाडी भाडे देणे असा सर्व खर्च काद्यांना मिळणाऱ्या पाचशे ते सहाशे रूपयात परवडत नाही. वाढत्या उष्णतेमुळे कांद्यांचे नुकसान होत असल्याने कांदा विकावाच लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत कांद्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शासनाने ठोस पावले उचलावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rising temperatures affect onion