समांतर रस्त्यांसाठी संयुक्त बैठक आवश्‍यकच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

शहरातील महामार्गाचे मजबुतीकरण 
दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्यावर्षी जानेवारीत सागरपार्कवर झालेल्या जाहीर कार्यक्रमात चौपदरीकरणाच्या कामांचे भूमिपूजन करतानाच शहरातील महामार्गाचे मजबुतीकरण व समांतर रस्त्यांच्या कामाचीही घोषणा एकनाथराव खडसेंच्या आग्रहास्तव केली होती. त्यामुळे महामार्ग व समांतर रस्ता "न्हाई'कडूनच विकसित होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्‍यक ती प्रक्रिया पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करुन घ्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. 

जळगाव - अनेक वर्षांपासून रखडलेल्या महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांच्या मालकीबद्दल महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (न्हाई) टोलवाटोलवी होत असताना या दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन रस्त्यांच्या मालकीची जबाबदारी निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून या बैठकीबाबत अपेक्षा असून त्यातून मनपा व न्हाईमध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

महामार्गाच्या चौपदरीकरणात शहराबाहेरुन बायपास मार्ग जाणार असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या शहरातील महामार्गासह समांतर रस्त्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अलीकडच्या काळात महामार्गावर प्रचंड वाहतूक वाढल्यानंतर अपघातांची संख्या वाढून निष्पाप नागरिकांचा यात बळी जात असल्याने महामार्गालगतचे समांतर रस्ते व्हावे म्हणून शहरात जनआंदोलन तयार होत आहे. मात्र, समांतर रस्त्यांची मालकी व ते विकसित करण्याच्या जबाबदारीच्या विषयावरुन महापालिका व महामार्ग प्राधिकरणाकडून टोलवाटोलवी सुरु आहे. पालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने "न्हाई'ने समांतर रस्त्यांची जबाबदारी झटकली आहे, तर आता आर्थिक कारण पुढे करत महापालिकेनेही समांतर रस्ते विकसित करणे मनपाला शक्‍य नसल्याचे सांगून टाकले आहे. यामुळे समांतर रस्ते विकसित करायचे तरी कुणी, हा प्रश्‍न कायम आहे. 

पालकमंत्र्यांकडून अपेक्षा 
या संभ्रम निर्माण करणाऱ्या स्थितीत शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी यासंदर्भात लवकरच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मनपा, न्हाई व बांधकाम विभागाची संयुक्त बैठक घेऊ, असे "सकाळ'च्या चर्चेदरम्यान स्पष्ट केले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही संयुक्त बैठक तातडीने घेऊन समांतर रस्त्यांच्या मालकीचा व ते विकसित करण्याच्या जबाबदारीचा विषय मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

शहरातील महामार्गाचे मजबुतीकरण 
दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्यावर्षी जानेवारीत सागरपार्कवर झालेल्या जाहीर कार्यक्रमात चौपदरीकरणाच्या कामांचे भूमिपूजन करतानाच शहरातील महामार्गाचे मजबुतीकरण व समांतर रस्त्यांच्या कामाचीही घोषणा एकनाथराव खडसेंच्या आग्रहास्तव केली होती. त्यामुळे महामार्ग व समांतर रस्ता "न्हाई'कडूनच विकसित होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्‍यक ती प्रक्रिया पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करुन घ्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. 

Web Title: road development in jalgaon