रेल्वेस्थानकाजवळील रस्ता रुंदीकरणाला अडथळा कुणाचा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

जळगाव - शहरात प्रवेश केल्याबरोबरच रेल्वेस्थानकाबाहेर बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होते. मात्र, या ठिकाणी नियमानुसार रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. अरुंद रस्त्यामुळे व त्यातही रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे या ठिकाणी दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात भररस्त्यात अडसर ठरलेले हॉटेलचे अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

जळगाव रेल्वेस्थानक परिसरात दररोज सकाळ-सायंकाळ मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असते. जळगावला जा-ये करणारे रोजचे प्रवासीही हजारोंच्या संख्येने आहेत. त्यामुळे ठराविक वेळेला तसेच प्रवासी गाड्या येण्यावेळी या परिसरात वाहतुकीचा मोठा बोजवारा उडतो. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या घटकांमध्ये रिक्षा व वाहनचालकांची मनमानी, रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण व मुख्य म्हणजे अरुंद रस्ता हे आहेत. 

३५ मीटरचा रस्ता २२ मीटरवर
रेल्वेस्थानक परिसरात दुभाजकाच्या दुतर्फा ३५ मीटर रुंद रस्ता आहे. मात्र, रेल्वेस्थानकापासून १०० मीटर अंतरावर हॉटेल बॉम्बेच्या ठिकाणी हा रस्ते ३५ मीटर नसून केवळ २२ मीटर रुंद आहे. नियमानुसार याठिकाणीही तो ३५ मीटरच असायला हवा. प्रत्यक्ष याठिकाणी जाऊन पाहणी केली, तरीही रस्त्यातच हॉटेल व अन्य व्यवसायाचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. यासंदर्भात २००८मध्ये महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला होता. त्यानुसार या रुंदीकरणात बाधित होणारे संबंधित हॉटेल व अन्य व्यावसायिक उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने रुंदीकरणाचा प्रस्ताव योग्य ठरवून मनपाने अंमलबजावणी करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर ८ वर्षे उलटूनही या रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय मार्गी लागलेला नाही. स्वाभाविकच या अरुंद  रस्त्याने या परिसरातील वाहतुकीची समस्या तीव्र बनली आहे. 

आयुक्तांनी दखल घ्यावी
महापालिकेचे विद्यमान आयुक्त जीवन सोनवणे त्यांच्या पारदर्शी कारभाराबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी या विषयाची दखल घेऊन रस्ता रुंदीकरणाबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: road expansion at railway station