चौपदरीकरणाचे काम पुन्हा चार महिने लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

जळगाव - राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आता पुन्हा चार-पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रक्रियेतील फागणे ते चिखली या टप्प्यातील कामाच्या निविदा निश्‍चित झाल्या असून, त्याबाबत तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर मक्तेदार कंपनीला कार्यादेश दिले जाणार आहेत. दरम्यान, महामार्ग विकास प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक आशिष असाटी यांनी मंगळवारी फागणे- नवापूर टप्प्यातील कामाची पाहणी करून नाशिक- धुळे- शिरपूर चौपदरी रस्त्यावरील टोलनाक्‍यांवर भेट देत तपासणीही केली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला लागलेले ‘ग्रहण’ सुटायला तयार नाही. चार वर्षांपासून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प काही ना काही कारणांमुळे रखडला आहे. नवापूर- अमरावतीदरम्यानच्या ४८४ किलोमीटर लांबीच्या या कामात नवापूर ते फागणे व चिखली ते अमरावती अशा दोन टप्प्यांच्या निविदा मंजूर होऊन कामही सुरू झाले आहे; तर फागणे ते तरसोद (८७.३ किलोमीटर) व तरसोद ते चिखली (६२.७ किलोमीटर) या दोन टप्प्यांतील कामांच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम ‘बीओटी’ वगळून ‘हायब्रीड’ तत्त्वावर करण्याचे ठरले आहे. त्यासाठी केंद्र सरकार ४० टक्के निधी देणार आहे.

तांत्रिक बाबींमुळे विलंब
दरम्यान, फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे ‘एमबीएल’ व ‘विश्‍वराज इन्फ्रा’ या कंपन्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही मक्तेदार कंपन्यांना चार नोव्हेंबरला ‘काम स्वीकृती’चे पत्र ‘नही’कडून देण्यात आले आहे; तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही कंपन्यांशी या कामांबाबत करार केला जाईल. करार झाल्यानंतर मक्तेदार कंपन्यांना ‘फायनान्शिअल ब्रीड’ (कामाचे स्वरूप व त्यासाठीच्या निधीची तरतूद) सादर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली जाईल. अर्थात, त्याआधीच ही ‘ब्रीड’ सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यादेश दिले जातील. ही सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच चौपदरीकरणाचे काम सुरू होईल.

...तर ऑक्‍टोबरपर्यंत प्रतीक्षा!
दरम्यान, मक्तेदार कंपन्यांशी करार, फायनान्शिअल ब्रीड आदी तांत्रिक बाबी पूर्ण होईपर्यंत मे महिना उजाडला, तर हे काम सुरू होऊ शकणार नाही, कारण, जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. स्वाभाविकच हे काम सुरू करण्यासाठी पावसाळा संपायची, अर्थात ऑक्‍टोबर २०१७ पर्यंतची प्रतीक्षा करावी लागेल.

फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली या दोन्ही टप्प्यांतील कामांच्या निविदा मंजूर झाल्या असून, जानेवारीत निविदाधारक कंपन्यांशी करार करण्यात येईल. कामांचे स्वरूप मोठे असल्याने कंपन्यांना ‘फायनान्शिअल ब्रीड’साठी काही महिन्यांची मुदत देण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यादेश दिले जातील. कार्यादेश दिल्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांची मुदत आहे.
- आशिष असाटी, मुख्य व्यवस्थापक, महामार्ग विकास प्राधिकरण

Web Title: road working again postponed for four months