मालेगाव परिसरात रात्रीत अकरा घरफोड्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

मालेगाव - शहराजवळील टेहेरे, पाटणे यांसह ब्राह्मणगाव (ता. बागलाण) या तीन ठिकाणी एकाच रात्रीतून अकरा घरफोड्या झाल्या. यातील चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यांनी टेहेरे येथील चार व पाटणे येथील एका घरफोडीत सुमारे नऊ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व 80 हजारांची रोकड चोरून नेली. 

नाशिक येथील मुथूट फायनान्स व निंबोल (ता. रावेर) येथील बॅंकेवर पडलेल्या दरोड्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी, ऑलआउट मोहीम व गस्त वाढवली असताना घरफोड्या झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

चोरट्यांनी टेहेरे व पाटणे येथील काही घरे बंद असल्याची संधी साधून, तर काही कुटुंबीय छतावर झोपले असताना वेगवेगळ्या ठिकाणी कडी-कोयंडा व दरवाजा तोडून घरफोड्या केल्या. विश्‍वास शेवाळे यांच्या घरून 18 तोळे सोने, पंकज शेवाळे यांच्या घरातून तीन तोळे सोने, 35 हजारांची रोकड, अनिल शेवाळे यांच्या मेडिकल दुकानातून 45 हजारांची रोकड, शिवाजी शेवाळे (चौघे रा. टेहेरे) यांच्या घरातून पावणेदोन तोळे सोने व पाच भार चांदी असा सुमारे आठ लाख 80 हजारांचा ऐवज लंपास केला. याच गावातील डॉ. राजेंद्र देवरे, अशोक शेवाळे, शशिकांत पाटील या तिघांच्या घरी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. टेहेरेनंतर चोरट्यांनी मोर्चा पाटणे गावात वळविला. तेथील कुंभारवाड्यातील राजेंद्र बोरसे यांच्या घरातून सोन्याचा ऐवज लंपास केला. निश्‍चित रक्कम समजू शकली नाही. घनःश्‍याम भावसार यांच्याकडे घरफोडीसाठी चोरटे गेले असताना, रहिवाशांना जाग आल्याने चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला. गर्दी जमा झाल्याने दोन दुचाकीवरील चोरटे पसार झाले. 

ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथेही दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी नंदिनी शेवाळे यांच्या घरातून साडेचार तोळे सोने व 18 हजारांची रोकड लंपास केली. जिभाऊ खरे यांच्या घराच्या काचा फोडून नुकसान केले. 

विश्‍वास शेवाळे यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात चार घरफोड्यांप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तिघांकडील घरफोडीचा प्रयत्न अपयशी झाल्याची नोंद झाली. पाटणे येथील श्री. बोरसे यांच्याकडील घरफोडीचा पोलिसांनी पंचनामा केला. अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. टेहेरे येथील घरफोडीचा प्रकार समजल्यानंतर छावणी पोलिसांनी तत्काळ श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना प्राचारण केले. पथकाने घरफोडी झालेल्या घरांमधून काही वस्तूंवरील ठश्‍यांचे नमुने घेतले. श्‍वानपथकाने गावातील रस्त्यापर्यंतचा माग दाखविला. छावणी पोलिस, विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरफोड्यांच्या तपासात गुंतले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून काही मागमूस मिळतो का, यावरून चौकशी सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in malegaon aera

टॅग्स