सातपुड्याच्या पायथ्यालगत गावांमध्ये वीस घरे फोडली 

crime
crime

गणपूर (ता. चोपडा) -  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा तालुक्‍यातील तीन गावांमध्ये काल (ता. 16) एकाच रात्री 20 घरफोड्या झाल्या आहेत. गणपूर येथे दहा, लासूरला आठ, तर चुंचाळेत दोन घरे चोरट्यांनी फोडली. गणपूरला सुमारे आठरा हजार, लासूर येथून एकाच्या घरातून 25 तोळे सोने व किरकोळ रक्कम, चुंचाळेत दहा हजाराची रक्कम चोरट्यांनी लांबवली आहे. घटनास्थळावर चोपडा व जळगाव येथील पोलिसांचे पथक दाखल झाले असून, कसून तपास करण्यात येत आहे. 

सातपुड्याच्या पायथ्यालगत गावांमध्ये चोरीचे सत्र सुरू झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. चोरटे मध्यप्रदेशातील असावेत असा संशय व्यक्‍त केला जात आहे. चुंचाळेत चोरट्यांच्या राहून गेलेल्या पिशवीत गुंगी येणाऱ्या औषधाच्या बाटलीसह टॉमी व अवजारे आढळली आहेत. या पिशवीवर अमळनेरचा पत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. अशाच प्रकारच्या कृतीने गेल्या आठवडाभरात यावल व रावेरच्या सातपुड्याच्या पायथ्यावरच्या गावातही घरफोड्या झाल्या आहेत. गणपूर येथे चोरट्यांनी चौकातील हायमास्ट लॅम्प बंद करून दहा घरांमध्ये चोरी केली. नारायण नाना दूध संस्थेत साहित्याची नासधूस करण्यात आली. चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मृत्युंजय मेडिकलमध्ये पन्नास रुपयांची चिल्लर लंपास झाली आहे. दोन कृषी केंद्रही फोडले असून, तेथे मात्र काहीच चोरीस गेलेले नाही. शिवाजी दगडू पाटील, रमेश माधवराव पाटील, संजय भालचंद्र पाटील, कैलास तुळशीराम पाटील, सुरेश वना पाटील, प्रभाकर अशोक पाटील यांच्या घरांचे कुलूप तोडून घरफोडी झाली आहे. प्रभाकर पाटील यांच्या घरातून सोने व रोख रक्कम असे सुमारे 18 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. यू. दाभाडे, हवालदार विष्णू भिल, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन घरांची पाहणी केली. लासूर येथे आठ ठिकाणी घरफोडी झाली आहे. यात योगेश काशिनाथ शिरसाठ, प्रेमराज दगडू सोनार, एन. एन. शिंपी, युवराज बाविस्कर, भागीरथाबाई मगरे, पंचायत समितीचे सदस्य अनिल हिंमतराव पाटील, सजन ठाकूर, ताराचंद कोळी या आठ ठिकाणी घरफोडी झाली आहे. त्यात श्री. शिंपी यांच्या घरातून 25 तोळे सोने लांबविले आहेत. इतर ठिकाणी किरकोळ रक्कम चोरीस गेली आहे. चुंचाळे येथे डॉ. नरेंद्र पाटील व विश्‍वनाथ चौधरी यांच्या घरांमध्ये चोरी झाली आहे. यात श्री. चौधरी यांच्या घरातून चार हजार रुपये रोख 35 ग्रॅम सोने लंपास झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

घटनास्थळी ठसेतज्ञांचे पथक दाखल झाले आहे. सर्वत्र कसून शोध घेण्यात येत आहे. श्‍वानपथकासही पाचारण करण्यात आले आहे. 

घरफोड्यांचे पोलिसांपुढे आव्हान 
नोटाबंदीने ग्रामीण भागातील जनता अगोदरच त्रस्त असताना, आता घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे. अमळनेर तालुक्‍यातील पातोंडा व कळमसरे येथेही नुकत्याच एका रात्री मोठ्या घरफोड्या झाल्या. पोलिसांचा कुठलाच धाक नसल्याचा संताप व्यक्‍त होत आहे. पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले असून, चोरट्यांना लवकर जेरबंद करण्याची मागणी होत आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com