ॲड. रोहिणी खडसेंची अपघातग्रस्तास मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

सावदा - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर यांनी गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्तास मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या मदतीमुळे अपघातग्रस्तावर वेळीच उपचार करता आल्याने त्याचे प्राण वाचले. 

सावदा - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर यांनी गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्तास मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या मदतीमुळे अपघातग्रस्तावर वेळीच उपचार करता आल्याने त्याचे प्राण वाचले. 

जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आज दुपारी अडीचला रावेर येथे लग्नसोहळ्यास गेलेल्या होत्या. तो आटोपून आपल्या महिंद्रा एक्‍सव्ही गाडीने (एमएच १९- सीजे १९) सावद्याकडे जाण्यासाठी निघाले. रस्त्यातच वडगाव फाट्यावर वाहनाने जनावरे चालणाऱ्या गुराख्याला जोरदार धडक दिली. यात तो गंभीररीत्या जखमी झालेला होता. त्याच्या तोंडातून रक्तस्राव होत होता. त्या ठिकाणी एकही वाहन थांबत नव्हते. साधारणतः तीनच्या सुमारास रोहिणी खडसे-खेवलकर व त्यांच्यासमवेत असलेले मस्कावद- थोरगव्हाण जिल्हा परिषद गटाचे सदस्य कैलास सरोदे, रावेरचे भाजपाचे सरचिटणीस महेश चौधरी, मक्‍सावदचे सरपंच संतोष वाघ यांना या ठिकाणी गर्दी दिसल्याने त्यांनी गाडी थांबवली.

रस्त्याच्या बाजूला रक्तबंबाळ झालेल्या जखमीचे नातेवाईक वाहनधारकांच्या विनवण्या करीत होते. मात्र, कोणीही थांबत नसल्याचे पाहून रोहीणी खडसे यांनी क्षणाचाही विलंब न करता, तत्काळ आपल्या गाडीत त्या तरूणाला टाकले व ताबडतोब त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेल्या तरूणाला त्यांच्या गाडीतून दवाखान्यात सोडून येईपर्यंत रोहिणी खडसे घटनास्थळी थांबून जखमी तरूणाच्या नातेवाईकांना धीर देत होत्या. त्या जखमी तरुणाचे नाव योगेश वाघोदे (वय ४०) असे असून वडगाव (ता. रावेर) येथील रहिवासी आहे. सावदा येथील डॉक्‍टरांशीही रोहीणी खडसे यांनी चर्चा केली व त्यानंतर योगेश वाघोदे यांना पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले. कुठलीही काही अडचण किंवा मदत लागल्यास लगेच कळवा व काळजी करू नका, असे सांगून रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जखमीच्या नातेवाइकांना धीर दिला.

Web Title: rohini khadse help to accident affected