आपत्कालीन सेवेसाठी रोटरी क्लबतर्फे मोफत रुग्णवाहिका भेट

रोशन खैरनार
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सटाणा - येथील रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणतर्फे आपत्कालीन रुग्णांसाठी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व माजी पाणीपुरवठा सभापती अरविंद सोनवणे यांना मोफत रुग्णवाहिका देण्यात आली. रोटरीचे माजी उपप्रांतपाल डॉ.प्रकाश जगताप व अरविंद सोनवणे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

सटाणा - येथील रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणतर्फे आपत्कालीन रुग्णांसाठी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व माजी पाणीपुरवठा सभापती अरविंद सोनवणे यांना मोफत रुग्णवाहिका देण्यात आली. रोटरीचे माजी उपप्रांतपाल डॉ.प्रकाश जगताप व अरविंद सोनवणे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले अरविंद सोनवणे यांनी अनेकवेळा रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवून मदत केली आहे. पाणीपुरवठा सभापती असताना शहरात पाणीटंचाई भेडसावू नये यासाठी विशेष उपाययोजना राबवून शहर टंचाई मुक्त करण्यात त्यांनी यश मिळविले होते. श्री. सोनवणे यांनी शहर व तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी अनेकवेळा रक्तदान शिबिरे व रोग निदान शिबिरे भरवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या या सामजिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणतर्फे गोरगरीब रुग्णांसाठी त्यांना मोफत रुग्णवाहिका देण्यात आली. सटाणा-देवळा, सटाणा-मालेगाव, सटाणा-ताहराबाद व सटाणा-नामपूर रस्त्यावर दररोज अनेक अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा उपचारांअभावी बळी जातो. श्री. सोनवणे यांच्या विंचूर-प्रकाशा राज्यमहामार्गावरील हॉटेल पावनखिंड परिसरात रुग्णवाहिका उभी राहणार असून, अपघात घडताच रुग्णांना तात्काळ रुग्णालयात हलविणे सोईचे होणार आहे. इतर आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांनाही या रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सटाणा शहरात सामाजिक बांधिलकीने सर्वसामान्य जनतेची सेवा करीत असून, या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून समाजाला मोफत सेवा पुरविणार असल्याचे श्री.सोनवणे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माजी उपप्रांतपाल डॉ.प्रकाश जगताप व अरविंद सोनवणे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. रोटरीचे अध्यक्ष उमेश बिरारी यांच्या हस्ते श्री.सोनवणे यांना रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जिभाऊ सोनवणे, डी.एल.अहिरे, सचिव प्रदीप बच्छाव, मनोज जाधव, शांताराम गुंजाळ, बी.के.पाटील, अभिजित सोनवणे, उमेश सोनी, डॉ.मनोज शिंदे, डॉ.अमोल पवार, रामदास पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Rotary Clubs donates Ambulance for Emergency Services