"सिम स्वॉईप'ने शासकीय ठेकेदाराला 37 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नाशिक - सिम स्वाईप पद्धतीने शहरातील शासकीय ठेकेदारास 37 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा संशयितांना सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. संशयितांच्या अटकेमुळे राज्यातील अनेक मोठे ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे उघड होणार आहेत. 

नाशिक - सिम स्वाईप पद्धतीने शहरातील शासकीय ठेकेदारास 37 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा संशयितांना सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. संशयितांच्या अटकेमुळे राज्यातील अनेक मोठे ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे उघड होणार आहेत. 

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जेल रोड येथील शासकीय ठेकेदार सतीश उत्तमराव पाटील यांच्या बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेतील चालू खाते हॅक करत सिम स्वॉईप पद्धतीने त्यांच्या खात्यामधून 37 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. नंतर ते काढून घेत फसवणूक केली होती. या गुन्ह्यातील संशयितांचा सायबर पोलिस ठाण्याकडून शोध सुरू होता. तपासी अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील दिवा येथून दिवाकर रमाकांत राय यास अटक करत त्याच्याकडे सखोल तपास केला असता, अक्रम ऊर्फ हबीब अजीज चौधरी याची माहिती समोर आली होती. या दोघांनी मिळून हा सर्व प्रकार केला होता. मात्र अक्रम याची कुठलीच माहिती पोलिसांकडे नसल्याने त्याला पकडणे मुश्‍किल झाले होते. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अक्रम हा केरळला विमानाने जाणार असल्याचे समजताच पोलिसांनी सदरच्या विमानाचा तपास करत अखेर अक्रम यास मुंबई विमानतळावरून अटक करत नाशिकला आणले. न्यायालयाने या दोघांनाही 9 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या दोघांकडून मोठ्या स्वरूपातील ऑनलाइन फसवणुकीची माहिती उघड होणार आहे. 

संबंधित कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव, अश्‍विनी पाटील, पोलिस हवालदार किरण जाधव, राहुल जगताप, योजेश राऊत, श्‍यामल जोशी, मंगेश काकुळदे यांचा समावेश आहे. 

Web Title: Rs 37 lakhs to the government contractor cheating