प्रतिमतदार ४० रुपये खर्च

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नाशिक - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रतिमतदार ४० रुपयांप्रमाणे साधारण नऊ कोटी २० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या खर्चाचे नियोजन केले जाते.

नाशिक - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रतिमतदार ४० रुपयांप्रमाणे साधारण नऊ कोटी २० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या खर्चाचे नियोजन केले जाते.

निवडणुकीच्या खर्चासंदर्भात शासनाचे नियम आहेत. विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी शासनाकडून थेट खर्च केला जातो. सामान्य प्रशासन विभागाकडून हा खर्च होतो. त्यासाठी खर्चाचे बंधन नसते. महापालिकांसाठी त्या-त्या महापालिकेकडून खर्च करण्यात येतो. महापालिकांच्या सर्व अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद केली जाते. जिल्हा परिषदेसह इतर यंत्रणा निवडणुकांच्या खर्चाचे नियोजन त्या-त्या विभागाकडून होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कामकाज ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येत असल्याने ग्रामविकास विभागाकडून प्रतिमतदार ४० रुपये याप्रमाणे खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात ७३ गट आणि १४६ गणांसाठी निवडणूक होत आहे. जिल्ह्यात २३ लाख मतदार असून, त्यासाठी सुमारे दोन हजार सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता भासणार आहे. स्टेशनरी, कर्मचारी, अधिकारी, बॅलेट आणि कंट्रोल युनिटची वाहतूक, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा नाश्‍ता, जेवण, निवडणूक काळातील त्यांचे मानधन, मतदान केंद्रांवर मतदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुरवाव्या लागणाऱ्या सेवा या सर्वांवर जिल्हा प्रशासनाला खर्च करावा लागणार आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २३ लाख मतदार असून, प्रतिमतदार ४० रुपये याप्रमाणे साधारण नऊ कोटी २० लाखांच्या आसपास खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात, मतदारयाद्या तयार करण्यापासून ते कर्मचाऱ्यांचे मानधन, निवडणुकीच्या काळातील स्टेशनरी, कर्मचारी मानधनासह भोजन व वाहतूक प्रवास, मतपेट्यांसह इतर सर्व खर्च यातून केला जातो.

Web Title: Rs 40 per voter