सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आजपासून नाशिक दौऱ्यावर 

Mohan-Bhagwat
Mohan-Bhagwat

नाशिक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत गुरुवारपासून (ता. 21) चार दिवस नाशिकमध्ये येत आहेत. महाराष्ट्र, गुजरात व गोवा या पश्‍चिम क्षेत्रातील संघाच्या स्वयंसेवकांच्या बैठकांत ते मार्गदर्शन करतील. 

पश्‍चिम क्षेत्रातील समाजजीवनातील विविध श्रेणीच्या स्वयंसेवकांच्या स्वतंत्र बैठका डॉ. भागवत यांच्या उपस्थितीत होतील. नाशिक शहरातील नियुक्त संघ स्वयंसेवकांची बैठक त्यांच्या उपस्थितीत होईल. संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मध्यरात्री नाशिक रोड रेल्वेस्थानकात डॉ. भागवत यांचे आगमन होणार आहे. स्वयंसेवकाच्या निवासस्थानी ते मुक्कामी असतील. सातपूरमधील मदन भंदुरे यांचे हे निवासस्थान असेल. गुरुवारी सकाळी साडेदहाला ते सातपूरमधील अशोकनगरमधील राज्य कर्मचारी वसाहतीमधील कार्यक्रमास उपस्थित असतील. दुपारी पावणेपाचला कृषीनगरमधील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. सायंकाळी साडेपाचला गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासमधील कार्यक्रमास उपस्थित राहतील. 

भोसला नर्सिंग महाविद्यालयात शुक्रवारी (ता. 22) सकाळी आठला बैठकीसाठी डॉ. भागवत उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी सहदेवनगरमधील दत्त चौकातील कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शनिवारी (ता. 23) सकाळी आठला भोसला नर्सिंग महाविद्यालयातील बैठकीसाठी ते उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता. 24) सकाळी आठ ते रात्री आठपर्यंतच्या उपक्रमात त्यांचा सहभाग असेल. रात्री आठला प्रसाद मंगल कार्यालयाशेजारील संजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट देऊन रात्री साडेदहाला नाशिक रोड रेल्वेस्थानकातून विदर्भ एक्‍स्प्रेसने ते नागपूरकडे रवाना होतील. या चार दिवसांच्या नाशिकमधील मुक्कामात डॉ. भागवत यांचा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही, असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर दौरा 
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. अशातच राज्यात सरकार स्थापण्यासाठी मुंबई, दिल्लीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा पार्श्‍वभूमीवर डॉ. भागवत यांचा नाशिक दौरा होत आहे. त्यामुळे सरसंघचालक राज्यातील राजकीय घडामोडींबद्दल काय मार्गदर्शन करणार आहेत याबद्दलची उत्सुकता नाशिकसह महाराष्ट्रातील स्वयंसेवकांत असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com