आरटीओ वाहन नोंदणी कॅम्प पूर्ववत जुन्या विश्रामगृहावरच भरवावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

सटाणा : येथील ताहाराबाद रस्त्यावरील पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय विश्रामगृह आवारात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून भरत असलेला आर.टी.ओ. वाहन नोंदणी कॅम्प कोणतीही पूर्वसूचना न देता शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिनार शासकीय विश्रामगृहावर हलविण्यात आल्याने शहर व तालुक्यातील वाहनधारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

सटाणा : येथील ताहाराबाद रस्त्यावरील पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय विश्रामगृह आवारात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून भरत असलेला आर.टी.ओ. वाहन नोंदणी कॅम्प कोणतीही पूर्वसूचना न देता शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिनार शासकीय विश्रामगृहावर हलविण्यात आल्याने शहर व तालुक्यातील वाहनधारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

येत्या ता.१० एप्रिलपासून हा कॅम्प पूर्ववत जुन्या विश्रामगृहाच्या आवारातच भरविण्यात यावा, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आज बुधवार (ता.२८) रोजी निवेदनाद्वारे दिला आहे. 

याबाबत सोनवणे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक जमीर तडवी व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सौ.एम.एम.चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. निवेदनात, शहरातील समको बँकेसमोरील पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय विश्रामगृह आवारात परिवहन विभागातर्फे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून वाहन नोंदणी कॅम्प भरविण्यात येत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी भरविल्या जाणाऱ्या या कॅम्पमध्ये शहर व तालुक्यातील सर्व प्रकारच्या वाहनांची नोंदणी, चालकांना वाहन चालविण्याचे परवाने देणे आदी कामे केली जातात. मोटार वाहन निरीक्षक स्वतः हजर राहून या वाहनांची नोंदणी करतात व वाहनचालकांना परवानाही देतात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरत असलेल्या या कॅम्पमुळे तालुक्यातून येणाऱ्या वाहनधारकांना सोईचे झाले होते. 

मात्र मालेगाव पाटबंधारे विभागाने समको बँकेसमोरील शासकीय विश्रामगृह आवारात यापुढे आर.टी.ओ. वाहन नोंदणी केम्प भरविण्यास बंदी घातल्याने हा कॅम्प आता शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील चिनार शासकीय विश्रामगृह आवारात हलविण्यात आला आहे. मात्र तालुक्यातील ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरून वाहनांची नोंदणी करण्याबरोबरच वाहन परवाना मिळविण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना या निर्णयाची कोणतीही माहिती नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना नाईलाजास्तव शहराबाहेर तीन किलोमीटर अंतरावर जावे लागते. नाशिक रस्त्यावरील चिनार विश्रामगृहालगत असलेल्या आवारात वाहनधारकांना बसण्यासाठी मुबलक जागा नाही.

पिण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. सध्याच्या ३५ ते ३८ अंश सेल्सियस तापमानात वाहनचालकांना भर उन्हामध्ये आपली वाहने उभी करून तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. यात ज्येष्ठ नागरिक, महिला व युवतींची मोठी कुचंबना होत असते. प्रादेशिक परिवहन विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन येत्या ता.१० एप्रिल रोजी होणारा कॅम्प शहरातील पूर्वीच्याच जुन्या विश्रामगृह आवारात पूर्ववत भरवावा आणि शहर व तालुक्यातील शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना दिलासा द्यावा. अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 

यावेळी दत्तू बैताडे, गिरीश सोनवणे, महेश ह्याळीज, गोकुळ भावसार, त्र्यंबक पवार, देवेंद्र सोनवणे, मोंटू पठाण, यशवंत कात्रे, दिलीप सोनवणे, नंदकिशोर सोनवणे, दिलीप काकळीज, नाना ह्याळीज, वसंत पगार, दादा पगार, सलीम मन्सुरी, जावेद पठाण, रऊफ शेख, किशोर सोनवणे, आर.जी.आहेर, मुरली पवार, शांताराम भामरे, नितीन देवरे, वसंत पवार आदींसह कार्यकर्ते व वाहनचालक उपस्थित होते. 

Web Title: RTO vehicle registration camp move to old rest house only