विंदा करंदीकर म्हणजे आत्मज्ञानातून जीवनाचे तत्वज्ञान मांडणारा कवी - डॉ. एकनाथ पगार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

'साहित्यायन' या संस्थेचा 34 वा वर्धापनदिन आणि विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम पाडला. 

सटाणा - विंदा करंदीकर यांच्या कवितांमध्ये तत्वज्ञान आहे. जगभरातल्या तत्वज्ञानाचे संचित त्यांच्या कवितांमध्ये दिसून येते. विंदांची विचारसरणी, विचारप्रणाली, सिद्धांत, आधुनिकवाद कवितांमध्ये होता आणि तो त्यांनी जगण्यातून मिळवला होता. विंदा म्हणजे आत्मज्ञानातून जीवनाचे तत्वज्ञान मांडणारा कवी आहे, असे मत प्रा. डॉ. एकनाथ पगार यांनी येथे व्यक्त केले. 

येथील 'साहित्यायन' या संस्थेचा 34 वा वर्धापनदिन आणि विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात 'विंदा व त्यांच्या कविता' या विषयावरील व्याख्यानात प्रा. डॉ. पगार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'साहित्यायन' संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस, प्रा. बी. डी. बोरसे, लेखिका सीमा सोनवणे, प्रा. किरण दशमुखे आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. पगार म्हणाले, कोकणाच्या मातीत जन्माला आलेल्या या कवीने आपल्या वैश्विक उंचीच्या, मानवतावादी वृत्तीच्या लेखनातही अस्सल कोकणी रंग जपला. विंदाच्या कविता आम्हाला चिंतन करायला लावते. त्यांच्या कवितांचे मुळ मानवतेवर आधारीत आहे. त्यांच्या कविता जगण्याच्या शील सांगत असते. यावेळी सटाणा महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रुती गाडेकर (तृतीय वर्ष, विज्ञान शाखा) यांनी विंदांच्या कवितांवर भाषण करताना म्हणाल्या, विंदा हे बहुआयामी व्यतिमत्व होते. ते विज्ञाननिष्ठ व जाणीववादी होते. त्यामूळेच कवी आणि समिक्षक या दोन्ही रुपात प्राप्त झालेली प्रतिभा आणि प्रज्ञा त्यांच्याकडे नांदू शकली.  

साहित्यायनचे सचिव बा. जि. पगार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पगार यांचा निवृत्तीनिमित्त साहित्यायनतर्फे सत्कार करण्यात आला. शं. क. कापडणीस, प्रा. बी. डी. बोरसे, दगा वाघ, किरण दशमुखे, सीमा सोनवणे, ज्योती जाधव, सुलभा कुलकर्णी आदींनी विंदांच्या विविध कवितांचे वाचन केले. कार्यक्रमास प्रा. सुनिल बागुल, रवींद्र भदाणे, बापू कुलकर्णी, हिरालाल गाडेकर, काशिनाथ डोईफोडे, सोपान खैरणार, सतीश चिंधडे, सोमदत्त मुंजवाडकर, मनिषा गाडेकर आदींसह साहित्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. बा. जि. पगार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
 

Web Title: sahityayan santha anniversary and vinda karandikar dr eknath pagar