ऐन दिवाळीत 'या' चिमुकल्याचा दुर्दैवी अंत..

रामदास वारुंगसे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

आनंदाने आपल्या मामाच्या घरी येत असलेला साई खेडकर या चिमुकल्यावर ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी काळाने घात केल्याने त्याचा मृत्यू झाला. मामा रामेश्वर माळी यांच्यासोबत घराकडे जात असताना अचानक साईने मामांचा हात सोडून घराच्या दिशेने धाव घेतली. परंतु घराच्या मार्गालगत अंदाज न आल्याने विहिरीत पाय घसरून साई ९० फूट विहिरीत पडला.

नाशिक : आनंदाने आपल्या मामाच्या घरी येत असलेला श्रीरामपूर जिल्ह्यातील खोकर भोकर गावातील इयत्ता चौथीत शिकणारा साई खेडकर या चिमुकल्यावर ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी काळाने घात केल्याने त्याचा मृत्यू झाला.

अशी घडली घटना.....

सोमवारी (ता.२८) सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यान डुबेरे (ता.सिन्नर) बस स्टॅन्डवरून मामा रामेश्वर माळी यांच्यासोबत साई आनंदाने आपल्या मामाच्या गाडीवरून घरी येत होता. घराजवळ आले असताना पावसामुळे चिखल असल्याने मामा रामेश्वर माळी यांनी गाडी दूर उभी करून घराकडे जात असताना अचानक साईने मामांचा हात सोडून घराच्या दिशेने धाव घेतली. परंतु घराच्या मार्गालगत न बांधलेल्या विहिरीचा साईला अंदाज न आल्याने विहिरीत पाय घसरून साई ९० फूट विहिरीत पडला. मामा रामेश्वर माळी पाठीमागून येत असताना हे बघितले व त्यांनीही लगोलग उडी मारली. अंधारमय वातावरणात हा प्रसंग घडला. रामेश्वर माळी यांना पोहता येत नाही परंतु भाच्याचा जीव वाचवण्यासाठी ७० फूट पाणी असलेल्या विहिरीत जीवाची पर्वा न करता उडी घेतली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही .

चिमुकल्या साई खेडकरवर काळाचा घात; परिसरात शोककळा

रात्री दोन वाजेपर्यंत सिन्नर नगरपालिका व माळेगाव एमआयडीसी अग्निशामक दल कर्मचारी शव बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर बेलू येथील जीव रक्षक गोविंद तुपे यांनी प्रयत्न सुरू केले. परंतु रात्रीची वेळ व पावसाची सतत रीप रीप, परिसरात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने पाण्याची पातळी खूपच वर आल्याने व विहीरही बांधीव नसल्याने मोठी अडचणी निर्माण होत होत्या. रात्री दोन नंतर मदत कार्य बंद करण्यात आले. सकाळी मदत कार्य पुन्हा सुरू करण्यात आले . नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांनीही तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदत पोहोचवली. माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार राहुल कातोरे, प्रशांत वाकचौरे, अग्निशामक दल, पोलीस दल, जीवरक्षक गोविंद तुपे, सागर गडाख, विलास गांगुर्डे यांच्या समन्वयाने सतरा तासानंतर साईचे शव बाहेर काढण्यात यश आले. दुर्दैवी घटनेने डुबेरे परिसरामध्ये शोककळा पसरली. स्थानिक तरुणांनी मोठ्या प्रमाणात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदत केली.

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांनी आपल्या घरा जवळच्या परिसरातील विहिरींना कठडा बांधून परिसर सुरक्षित करायला हवा. जेणेकरून साई सारख्या दुर्दैवी घटना भविष्यात टाळता येतील - जिल्हाधिकारी सुरज मांढरे 

सण-उत्सव बाजूला ठेवून जीवरक्षक प्रशासनासोबत कठीण प्रसंगी काम करण्यास तत्पर असतात. प्रशासनाने जीव रक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन यांच्याही प्रश्‍नांकडे गांभीर्याने बघावे .जीवन रक्षकांना मिळणारे किट त्यामधील ऑक्सिजन संपल्यानंतर त्यातील त्यासाठी लागणारे खर्च. जोखमीचे कामे करताना झालेल्या दुखापती यासाठी लागणारा वैद्यकीय खर्च प्रशासनाने मंजूर करावा - गोविंद तुपे, जीवरक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Khedkar fell 90 feet into the well